महिलांची संख्या लक्षणीय, दुपापर्यंत ५० टक्के मतदानाचा अंदाज

रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी पनवेल तालुक्यात मंगळवारी मतदान झाले. उन्हाची पर्वा न करता मतदार मोठय़ा संख्येने घराबाहेर पडले. त्यामुळे जवळपास सर्वच मतदानकेंद्रांवर रांगा लागल्या होत्या. महिलांची संख्या लक्षणीय होती.

अडीच वर्षांपूर्वी काँग्रेसला रामराम ठोकून भाजपवासी झालेल्या ठाकूर कुटुंबीयांच्या बालेकिल्ल्यात पहिल्यांदाच ग्रामीण भागातील मतदारांचा कस लागत असल्याने वाढलेली टक्केवारी कोणाच्या पथ्यावर पडणार हे गुरुवारी स्पष्ट होणार आहे. पनवेल महापालिका क्षेत्रवगळता तालुक्यातील ग्रामीण भागांतील वांवजे, नेरे, केळवणे, विचुंबे, गव्हाण, कालुंद्रे, उलवा, पळस्पे या ग्रामीण भागांत चांगले मतदान झाले. दुपापर्यंत मतदानाची टक्केवारी ५०च्या पुढे गेली होती. पनवेल पालिका स्थापन झाल्यानंतर होणाऱ्या या पहिल्याच निवडणुकीत आगामी काळातील पालिका निवडणुकीची झलक दिसणार असल्यामुळे जिल्हा परिषदेची निवडणूक महत्त्वाची मानली जात आहे.

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी जिल्ह्य़ात शेकाप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी महाआघाडी केली आहे. या महाआघाडीसमोर भाजपचे आव्हान असून पक्षांपेक्षा तालुक्यात भाजपाचे रामशेठ ठाकूर विरुद्ध शेकापचे विवेक पाटील सामना रंगल्याचे चित्र होते.

शेकापने काही दिवसांपूर्वीच बाजार समिती, अर्बन बँक, शिक्षक मतदार संघात बाजी मारल्याने या निवडणुकीत जास्तीत जास्त जागा निवडून येण्याची आशा बाळगली आहे, तर आमदार प्रशांत ठाकूर यांच्या अस्तित्वाची लढाई असल्याने तेही प्रत्येक प्रभागात जातीने लक्ष घालत आहेत.

आमिषे दाखविणे सुरूच

ग्रामीण भागात नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळ उभे राहणार असून त्याचे काम नुकतेच जीव्हीके कंपनीला जाहीर झाले आहे. त्यामुळे रोजगार आणि उद्योगधंद्याच्या अनेक संधी उपलब्ध होणार आहेत. ठाकूर आणि पाटील समर्थकांकडून लक्ष्मीदर्शनासह विमानतळाची छोटीमोठी कामे देण्याचे आश्वासनही दिले जात आहे. एका गावात एक मतासाठी १० हजार रुपये दिल्याची चर्चा असून इतर ठिकाणी मतांचा दर हजार ते दोन हजार रुपये होता असेही बोलले जात होते. ओएनजीसीजवळील उसरोली गावात अशाच पैसे वाटपावरून पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना हुसकावून लावले.