गड पायी चालणाऱ्या शिवप्रेमींना यातना
केवळ ‘रायगड’ महोत्सवाचे नाव देऊन किल्ल्याच्या पायथ्याशी ‘पाचाड’ येथे सर्व सोपस्कार आटोपून काही तरी भव्यदिव्य करीत असल्याचा आव आणणाऱ्या सांस्कृतिक विभागाने आयोजित केलेला रायगड महोत्सव गड पायी चढणाऱ्या हजारो शिवप्रेमींसाठी ‘त्रासदायक’ ठरल्याचे दिसून आले. या महोत्सवाला येणारे पर्यटक हे जणू काही रोपवेनेच गडावर जातील असे गृहीत धरून पायी मार्गाला पूर्णपणे दुर्लक्षित ठेवण्यात आले होते. त्यामुळे या मार्गावर पायऱ्यांची डागडुजी, वीज, पिण्याचे पाणी, आरोग्य पथक यांची कमतरता होती. विशेष म्हणजे ज्या रायगडच्या नावाने कोणाचे तरी चांगभलं केले गेले तो रायगड चार दिवस अंधारात आणि पाचड झगमगाटात असे विरोधी दृश्य शिवप्रेमींना पाहण्यास मिळाले. या महोत्सवाच्या निमित्ताने रायगडाकडे जाणारे रस्ते चकाचक झाले, तर पाचाडसाठी पाणी योजना मंजूर झाली.
राज्याच्या सांस्कृतिक संचालनालय विभागाच्या वतीने गुरुवार ते रविवार हे चार दिवस रायगड महोत्सव आयोजित करण्यात आला होता. रायगड महोत्सवाच्या नावाने आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्यात गडावर पहिल्या दिवशी शिवराज्याभिषेक सोहळय़ाचे नाटय़ रूपांतर याव्यतिरिक्त एकही कार्यक्रम झाला नाही. गडावर चार दिवस अगोदर गोंडय़ाच्या फुलांनी सजवलेले समाधी स्थळ, जगदेश्वर मंदिर, आसनाधिष्ठ पुतळा आणि राज्याभिषेक दरबार, पदोपदी लावलेले भगवे झेंडे, हत्ती व घोडय़ांच्या प्रतिकृती, बाजारपेठेत अंथरलेले अस्ताव्यस्त मखमली कपडे, शस्त्रअस्त्रांचे प्रदर्शन, जुन्या कंदिलांचा खजिना याव्यतिरिक्त महोत्सव वाटावे असे काही नव्हते. अनेक प्रदर्शनांत वरचेवर दिसणारी ही दृश्ये शिवकालीन म्हणून खपविण्यात आली होती.
ज्यांच्या नावाने हा महोत्सवाचे आयोजन केले गेले होते त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर एक दिवादेखील या चार दिवसांत लावला गेला नाही.
सरकार म्हणणाऱ्या यंत्रणेला ते कठीण नव्हते. गडावर अंधार असताना पाचाड येथे विजेचा लखलखाट होता. राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले सर्व आबालवृद्ध रोपवेनेच गडावर चढाई करतील असे गृहीत धरून केवळ ऑनलाइन आरक्षणाची व्यवस्था करण्यात आली होती. ग्रामीण भागातील शिवप्रेमींना या ऑनलाइन आरक्षण करता आले नाही.