03 March 2021

News Flash

शहरबात- उरण : भाजपच्या कोंडीसाठी आघाडीचा वायदा

महानगरपालिकेत शेतकरी कामगार पक्ष आणि भाजपा यांच्यातच लढाई होणार हे स्पष्ट आहे.

 

महानगरपालिकेत शेतकरी कामगार पक्ष आणि भाजपा यांच्यातच लढाई होणार हे स्पष्ट आहे. येथील शहरी भागात भाजपा तर ग्रामीण भागात शेकाप वरचढ आहे. त्यात शेकापला काँग्रेस राष्ट्रवादीची साथ मिळाल्यास फायदा होणार आहे. तर भाजपालाही शिवसेनेच्या युतीची आस असली तरी मुंबई महानगरपालिकेच्या सत्तेमुळे पेटलेले राजकारण कोणते वळण घेते यावर ही युती अवलंबून आहे. मात्र या निवडणुकीत शेतकरी कामगार पक्ष, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी निश्चित मानली जात आहे. त्यामुळे जिल्ह्य़ात सर्वत्र भाजपची कोंडी करण्याचा शेकाप प्रयत्न करीत आहे.

रायगड जिल्हा परिषदेवर पुन्हा एकदा शेतकरी कामगार पक्ष आणि राष्ट्रवादीच्या आघाडीची निर्विवाद सत्ता आली आहे. या निवडणुकीत या दोन्ही पक्षांसह काही ठिकाणी काँग्रेसही साथीला होती. सत्ताकरणाच्या या बेरजेच्या गणितात रायगड जिल्ह्य़ात शिवसेना आणि भाजपला टक्कर देण्यासाठी तिन्ही पक्षांनी समविचारी नावाने मिशन २०१९ च्या विधानसभेच्या निवडणुकांसाठी मोट बांधण्याचे संकेत दिले आहेत. याची प्राथमिक बैठक रविवारी पनवेलमधील तारा येथे झाली. या बैठकीत शेकाप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी काँग्रेसला साथ देण्याची हाक दिली. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये पनवेलमध्ये शेकाप, काँग्रेसला तर पेणपासून पुढे शेकाप राष्ट्रवादीला यश आले आहे. त्यामुळे हीच आघाडी कायम ठेवून जिल्ह्य़ात २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजपला रोखण्यासाठी दोन वर्षे आधीच रणनीती आखण्यास सुरुवात झाली आहे.

रायगड जिल्ह्य़ात जवळपास अर्धे शतक शेकाप कोणत्या ना कोणत्या युती  वा आघाडीच्या माध्यमातून सत्तेत वाटेकरी आहे. याच सत्तेच्या जोरावर रायगड जिल्हा हा शेकापचा बालेकिल्ला असल्याचे संबोधले जाते. सुरुवातीला स्वबळावर, त्यानंतर नव्वदीच्या दशकापासून ते २०१२ पर्यंत शिवसेना-भाजपा युतीमुळे तर त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सहकार्याने सत्ता उपभोगत आहे. यातील राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचा जिल्हा परिषद अध्यक्ष पदाचा काळ वगळता शेकाप सलग सत्तेत राहिला आहे. याच माध्यमातून अलिबागसारखा गड राखण्यात त्यांना यश आले आहे. पनवेल परिसरात शेकाप सोडून प्रथम काँग्रेस, तर २०१४ ला भाजपमध्ये प्रवेश करणारे माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्यामुळे शेकाप कमजोर झालेला असला तरी शेकापची ताकद टिकून आहे. या निवडणुकीसाठी भाजपने स्वबळावर निवडणुका लढविण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी जिल्ह्य़ात झालेल्या मुख्यमंत्र्यांच्या गव्हाण येथील जाहीर सभेचाही फायदा झालेला नाही. कारण ही जागा शेकापने जिंकली आहे. त्यामुळे शेकापचा विश्वास वाढला आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत पनवेल तालुक्यातील आठपैकी सहा जागा जिंकत शेकापने पनवेलवरील आपले वर्चस्व सिद्ध केले आहे, तर भाजपला अवघ्या दोन जागांवर समाधान मानावे लागले आहे. पनवेल आणि उरणचे नेतृत्व माजी आमदार विवेक पाटील करीत आहेत. त्यांना २०१४ मधील विधानसभा निवडणुकीत पराभव पत्करावा लागला आहे. त्यामुळे एकेकाळी युतीतील पक्ष असलेला शिवसेना हा शेकापचा पहिल्या क्रमांकाचा शत्रू झाला आहे.

उरण विधानसभेची जागा शिवसेनेने जिंकल्यानंतर त्यांची ताकद वाढण्याऐवजी घटू लागली असल्याचे चित्र आहे. आमदार मनोहर भोईर यांनी त्यांचा नवघर मतदारसंघ राखला असला तरी पंचायत समितीच्या चार जागांवरून त्यांना दोन जागावंर समाधान मानावे लागले आहे. तर पनवेल परिसरात एकही जागा जिंकता आली नाही. तर काँग्रेस शेकापची आघाडी झाल्याने जिल्ह्य़ातील काँग्रेसच्या वाटय़ाला आलेल्या तीन जिल्हा परिषदेच्या जागांमध्ये उरणमधील दोन जागा मिळविण्यात यश आले आहे. या निवडणुकीत शेकाप व काँग्रेस तसेच शेकाप राष्ट्रवादी ही आघाडी फायद्याची ठरली आहे. त्यामुळे पुढील निवडणुकांतही सत्तेत असलेल्या भाजपा आणि वाढणाऱ्या शिवसेनेला रोखण्यासाठीची रणनीती तयारी केली जात आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत याची सुरुवात झाली आहे. राज्याच्या वरिष्ठ नेत्यांकडून या निवडणुकीत शेकाप सोबत जाण्याचे संकेत देण्यात आले होते. याचा फायदा झाल्याने येत्या काळात रायगडमध्ये विधानसभेसाठी जागांची गोळा बेरीज करून शेतकरी कामगार पक्ष, राष्ट्रवादी व काँग्रेस अशी आघाडी उदयास आल्यास आश्चर्य वाटणार नाही. त्याची नांदी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकातून सुरू झाली आहे.

पनवेल महानगर पालिकेतही आघाडीची शक्यता नव्याने निर्माण झालेल्या पनवेल महानगर पालिकेत सत्तारूढ होण्यासाठी भाजपाने तयारी केली आहे. या पालिकेची निर्मितीही भाजपाची पहिली सत्ता आणण्याच्याच उद्देशाने केली, असल्याची चर्चा होत होती. या महानगर पालिकेची निवडणूक एप्रिल किंवा मेमध्ये होण्याची शक्यता आहे.

महानगरपालिकेत शेतकरी कामगार पक्ष आणि भाजपा यांच्यातच लढाई होणार हे स्पष्ट आहे. येथील शहरी भागात भाजपा तर ग्रामीण भागात शेकाप वरचढ आहे. त्यात शेकापला काँग्रेस राष्ट्रवादीची साथ मिळाल्यास फायदा होणार आहे. तर भाजपालाही शिवसेनेच्या युतीची आस असली तरी मुंबई महानगरपालिकेच्या सत्तेमुळे पेटलेले राजकारण कोणते वळण घेते यावर ही युती अवलंबून आहे. मात्र या निवडणुकीत शेतकरी कामगार पक्ष, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी निश्चित मानली जात आहे. त्यामुळे जिल्ह्य़ात सर्वत्र भाजपची कोंडी करण्याचा शेकाप प्रयत्न करीत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 28, 2017 4:47 am

Web Title: raigad local body polls result 2017 raigad district panchayat samiti election result 2017
Next Stories
1 नवी मुंबईत शिवसेनेच्या पुनर्रचनेचे संकेत
2 पाम बीच मार्गाला नव्याने मुलामा
3 वाशी खाडी पुलाची दुरुस्ती सुरू
Just Now!
X