गेले १५ दिवस हार्बर रेल्वेच्या वेळापत्रकाचा गोंधळ सुरू आहे. यामुळे त्रस्त झालेल्या प्रवाशांचा संयम मंगळवारी सुटला. संतप्त प्रवाशांनी रुळांवर उतरून सुमारे पाऊण तास ‘रेल रोको’ केला. रेल्वे प्रशासन आणि पोलिसांनी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. पावणेदहा वाजता पनवेलहून छत्रपती शिवाजी टर्मिनसकडे पहिली लोकल सुटली.

स्थानकातील लोकलची वेळ दर्शवणारा फलक आणि उद्घोषणा यांचा ताळमेळ जुळत नसल्याने प्रवाशांच्या गोंधळात रोजच भर पडत आहे. यात मंगळवारी सकाळी साडेआठ वाजता लोकल ठप्प झाली. त्यामुळे प्रवाशांच्या सहनशीलतेचा अंत झाला.

पनवेल स्थानकातून दररोज दीड लाख प्रवासी ये-जा करतात. परंतु स्थानकातील सुविधा पुरेशा प्रमाणात नाहीत. त्यात गाडय़ांचा गोंधळ हा नेहमीचाच प्रकार झाला आहे. कार्यालयीन वेळेत तरी पनवेल- मुंबईदरम्यान गाडय़ांची संख्या वाढविण्याची मागणी सातत्याने केली जात आहे; मात्र या मागण्यांकडे प्रशासनाने पुरेशा गांभीर्याने लक्ष दिलेले नाही.

सकाळी ८ वाजून २४ मिनिटांनी वाशी स्थानकाशेजारील ओव्हरहेड वायर तुटल्याने वाशी ते पनवेल रेल्वे स्थानकादरम्यानची वाहतूक कोलमडली. परंतु याबाबतची कोणतीही माहिती पनवेल स्थानकातील प्रवाशांना मिळत नव्हती. त्यामुळे प्रवाशांचा गोंधळ अधिकच वाढला. त्यात नऊ वाजता नेरुळपर्यंत जाणारी रेल्वे सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. ही उद्घोषणा होताच रुळांवर उतरण्याचा निर्णय घेतला. पनवेल स्थानकाचे व्यवस्थापक डी. के. गुप्ता यांच्याकडे वेळापत्रकात बिघाड होणार नाही, याची लेखी हमी घेतल्यानंतर प्रवाशांनी आंदोलन मागे घेतले.