तळोजा पाचनंद उड्डाणपुलाला रेल्वेचा हिरवा कंदील

तळोजा पाचनंद येथे दिवा-पनवेल रेल्वे मार्गावर मेट्रोसाठी बांधाव्या लागणाऱ्या उड्डाणपुलाला रेल्वे प्रशासनाने तब्बल पाच वर्षांनंतर परवानगी दिली आहे. सिडको या उड्डाणपुलाचे काम लवकरच सुरू करणार आहे. रेल्वे सुरक्षा विभागाचे पथक मार्गाची पाहणी करेल आणि त्यानंतर सुमारे १२०० टनांची तयार तुळई या मार्गावर बसवली जाईल. या पुलाखालून दिवा-पनवेल व कोकण रेल्वे जाणार असल्याने हा पूल सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणार आहे. डिसेंबर २०१४ मध्ये सुरू होणाऱ्या नवी मुंबई मेट्रोच्या कामाने आता पुन्हा गती घेतली आहे. मे २०१८ मध्ये ही मेट्रो धावणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

मुंबई मेट्रोसाठी जमीन संपादनाची किचकट प्रक्रिया पार पाडावी लागल्याने मुंबई मेट्रो उशिरा सुरू झाली. नवी मुंबईतील सर्व जमीन सिडकोच्या मालकीची असल्याने जमीन संपादनाची कोणतीही अडचण निर्माण न झाल्याने सिडकोने मे २०११मध्ये साडेचार हजार कोटी रुपये खर्चाच्या नवी मुंबई मेट्रोच्या कामाला सुरुवात केली. त्या वेळी हा प्रकल्प विमानतळाच्या आधी म्हणजेच डिसेंबर २०१४मध्ये पूर्ण करण्यात येईल असे जाहीर करण्यात आले होते. मात्र मध्यंतरी विमानतळ प्रकल्पाला महत्त्व देताना या प्रकल्पाकडे दुर्लक्ष झाले होते. त्याला आता पुन्हा गती आली आहे.

बेलापूर ते पेंदार या ११ किलोमीटरच्या पहिल्याच मेट्रो रेल्वे प्रकल्पात अडसर ठरू पाहणाऱ्या तळोजा पाचनंद येथील मेट्रोसाठी लागणाऱ्या उड्डाणपुलाला मध्य रेल्वेने परवानगी दिली आहे. गेली चार वर्षे ही परवानगी नाकारली जात होती. सिडको आता या ठिकाणी १०० मीटर उंचीचा उड्डाणपूल बांधण्यास सुरुवात करणार आहे. या उड्डाणपुलाच्या खालून दिवा-पनवेल आणि कोकण रेल्वे धावणार असल्याने हे काम अंत्यत जोखमीचे आहे. मध्य रेल्वेचे सुरक्षा पथक लवकरच या जागेची पाहणी करणार आहे. मेगा ब्लॉक घेऊन हे काम पूर्ण करावे लागणार आहे. हा उड्डाणपूल झाल्याने नवी मुंबई मेट्रो तळोजा पाचनंदच्या पूर्वेला जोडली जाणार आहे. याच ठिकाणी सिडको पाचनंद मेट्रो स्थानक बांधण्यात येणार आहे.

पुढच्या वर्षी मेट्रो धावण्याची शक्यता

नवी मुंबई मेट्रोसाठी मे २०१८ ही मुदत निश्चित करण्यात आली आहे. व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांनी जुन्या प्रकल्पांना गती देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गेली तीन वर्षे अडगळीत पडलेल्या मेट्रो प्रकल्पाने जोर धरला आहे. व्हायडक्टचे काम अंतिम टप्यात आहे. त्यानंतर सिग्नल, टेलिकम्युनिकेशन, रोलिंग, आणि अ‍ॅटो फेअर ही कामे असून ती करण्यासाठी लागणारा तांत्रिक मेट्रो डबा नुकताच कारशेडमध्ये दाखल झाला आहे. त्यामुळे पुढील वर्षी नवी मुंबई मेट्रो धावताना दिसणार आहे.

खारघर पाचनंद शहरी भागांना जोडणाऱ्या या मेट्रो उड्डाणपुलासाठी सिडको गेली अनेक वर्षे परवानगी मागत होती. ती मध्य रेल्वेने आता दिली असून सर्व तपासणीनंतर या कामाला सुरुवात केली जाईल.

एस. आर. दराडे, मुख्य अभियंता, विशेष प्रकल्प, सिडको