X

अंत्ययात्रेसाठी शेकडो जीव टांगणीला

आग्रोळी गावातील ग्रामस्थांना रूळ ओलांडून बेलापूर येथील स्मशानभूमी गाठावी लागत आहे.

स्मशानभूमीत जाण्यासाठी आग्रोळीतील रहिवाशांवर रूळ ओलांडण्याची वेळ

गाव आहे पण स्मशानभूमी नाही. त्यामुळे गावात एखाद्या व्यक्तीचे निधन झाल्यास अंत्यसंस्कारांसाठी मृतदेह रेल्वेमार्गापलीकडे घेऊन जावा लागतो. अंत्ययात्रेत सहभागी झालेल्या सर्वाना जीव मुठीत धरून रूळ ओलांडावा लागतो. हे कोणत्याही खेडेगावाचे वर्णन नाही. ही स्थिती आहे नियोजनबद्धतेचा तोरा मिरवणाऱ्या नवी मुंबईतील. येथील आग्रोळी गावातील ग्रामस्थांना रूळ ओलांडून बेलापूर येथील स्मशानभूमी गाठावी लागत आहे.

नवी मुंबईतील अनेक मूळ गावांपैकी आग्रोळी हे एक गाव आहे. गाव म्हटले की मूळ गावठाण, ग्रामदेवता, बाजार, स्माशानभूमी या पायाभूत सुविधा हव्याच. पण चारही दिशांनी शहरानी वेढलेल्या आग्रोळीसाठी पालिकेने स्मशानभूमीची सोय केलेली नाही. त्यामुळे एखाद्या गावकऱ्याचे निधन झाल्यास इतरांना अंत्ययात्रेसाठी जीव धोक्यात घालून रेल्वेमार्ग ओलांडावा लागतो आणि बेलापूर येथील स्मशानभूमीत जावे लागते. यात एखादी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे गावातच स्मशानभूमीसाठी जागा देण्यात यावी, अशी ग्रामस्थांची मागणी आहे. सिडको आणि पालिका या मागणीकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे गावकरी संतप्त झाले आहेत.

नवी मुंबई महापालिकेची स्थापना करताना ग्रामस्थांच्या हक्काच्या जमिनी सिडकोने संपादित केल्या. मात्र त्यांना अद्याप मूलभूत सुविधा दिलेल्या नाहीत. आग्रोळी गावाला स्मशानभूमीच नाही. आग्रोळी आणि बेलापूरच्या मधून पनवेल सीएसटी हा रेल्वेमार्ग गेला आहे. नेरुळ-उरण मार्गाचे काम झाल्यास लवकरच आग्रोळी व बेलापूर गावाजवळील सध्या वापरात नसलेल्या रेल्वे बोगद्यातून रेल्वेवाहतूक सुरू होईल. त्यामुळे आग्रोळी गावतून बेलापूर गावच्या दिशेला रेल्वेमार्गावर तारेचे कुंपण घालण्यात आले आहे. लोकल गाडी येताच अंत्ययात्रेतील अर्धे लोक पुढे आणि उर्वरित मागे अशी स्थिती उद्भवते. वृद्धांना तर याचा फारच त्रास होतो.

अंत्ययात्रेदरम्यान उडणारी ही तारांबळ थांबावी म्हणून लवकरात लवकर आग्रोळी गावात स्मशानभूमी बांधावी, अशी मागणी ग्रामस्थ अनेक वर्षांपासून करत आहेत. परंतु त्याकडे पूर्णपणे डोळेझाक केली जात आहे. स्थानिक नगरसेविका सरोज पाटील यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे महापालिकेने २०११ मध्ये आग्रोळी गावात स्मशानभूमी बांधण्याचा प्रस्ताव तयार केला होता. स्मशानभूमीसाठी ३३ लाखांच्या कामाची निविदाही काढण्यात आली होती. बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी गावच्या स्मशानभूमीसाठी विधानसभेतही तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. मात्र आजही हा प्रश्न भिजत घोंगडेच ठरला आहे.

आग्रोळी गावात स्मशानभूमी असावी म्हणून सातत्याने पाठपुरावा केला आहे. महासभेतही प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. आयुक्त व महापौरांनाही निवेदने दिली आहेत. मृतदेहच पालिका मुख्यालयात नेल्यावर प्रशासनाला जाग येणार आहे का?

सरोज पाटील, स्थानिक नगरसेविका 

आमच्या गावात स्मशानभूमी नसल्याने आम्हाला अंत्ययात्रेसाठी बेलापूर गावात जावे लागते. त्यामुळे अंत्ययात्रेत सहभागी झालेल्या शेकडो व्यक्तींच्या जिवाला धोका निर्माण होतो. प्रशासनाने तात्काळ हा प्रश्न सोडवला पाहिजे. पालिकेने गावाजवळील पाण्याच्या टाकीच्या परिसरात स्मशामभूमीसाठी निविदाही काढली होती. त्यावर अद्याप अंमलबजावणी झालेली नाही.

सुधीर पाटील, आग्रोळी ग्रामस्थ

आग्रोळीच्या स्मशानभूमीसाठी प्रस्ताव तयार करण्यात आला होता. पालिका प्रयत्नशील आहे. लवकरात लवकर स्मशानभूमी बांधण्यात यावी, यासाठी पालिका प्रशासन योग्य पावले उचलेल.

दादासाहेब चाबुकस्वार, उपायुक्त, नवी मुंबई महापालिका

Outbrain