भिंत तुटली; अनेक ठिकाणी गळती

नवी मुंबईतील इलठण पाडा परिसरात रेल्वेचे दिघा धरण असून त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. धरणाची भिंत एका बाजूला तुटली असून अनेक ठिकाणी गळती आहे. त्यामुळे या धरणालाही धोका निर्माण होऊ शकतो.

चिपळूणनजीक असलेले तिवरे धरण फुटल्याची घटना घडली. या पार्श्वभूमीवर या धरणाची पाहणी केली असता हा प्रकार समोर आला आहे. दुर्घटना घडली अडीच लाख नागरिकांच्या जिवाला धोका संभवू शकतो.

दिघ्यानजीक इलठणपाडा येथे इंग्रजांनी हे धरण बांधले होते. ते रेल्वेच्या ताब्यात आहे. सुमारे १५ दशलक्ष घनमीटर पाण्याची साठवण क्षमता या धरणाची असून सध्या या पाण्याची रेल्वेला गरज नसल्याने या धरणाकडे दुर्लक्ष होत आहे. धरणाची भिंत एका बाजूला तुटली आहे. अनेक ठिकाणी गळती सुरू असल्याचे दिसत आहे. या धरणावर आतापर्यंत २५ पेक्षा जास्त जणांचा विविध घटनांत मृत्यू झाला आहे. ईलठणनगर, कृष्णानगर या झोपडपट्टीत राहणारी मुले येथे मनसोक्त डुंबत असतात. कसलीही सुरक्षा व्यवस्था दिसत नाही.

धरणाचे पाणी ज्या दिशेने वाहते तेथे गजबजलेली अशी बेकायदा झोपडपट्टी आहे. त्यामुळे काही दुर्घटना घडल्यास मोठी जीवितहानी होऊ शकते. अनेक वर्षांपासून नवी मुंबई  पालिका याचा ताबा मागत आहे. नवी मुंबईला पाण्याची कमतरता नसल्याने हे धरण आम्हाला द्या अशी ठाणेकरांची मागणी पुढे आली आहे. मात्र याबाबत कोणताही निर्णय होत नाही. दुरवस्थेमुळे या धरणाची डागडुजी किंवा नव्याने बांधकामाची गरज आहे.

याबाबत मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी सुनील उपासे यांना विचारले असता त्यांनी या बाबतची माहिती मला नसून माहिती घेऊन सांगतो, असे सांगितले. कधीपर्यंत सांगणार असे विचारल्यानंतर मी एका कार्यक्रमात जात असून तुम्ही जैन यांना संपर्क करा असा सल्ला दिला. त्यानंतर जैन आणि उपासे यांच्याशी संपर्क होऊ  शकला नाही.

चार दिवसांपासून पडणाऱ्या पावसाने आमची झोप उडवली आहे. धरणाच्या पायथ्याला आमच्या झोपडय़ा आहेत. शासनाने काही तरी उपाययोजना करावी.

-विकास प्रजापती, रहिवासी