पर्यायी रस्ता नसल्याने नागरिक हतबल
ठाणे-वाशी हार्बर रेल्वेमार्गावर ऐरोली नाका, रबाळे, तुभ्रे येथील रेल्वे फाटके रहिवांशासाठी धोकादायक ठरत आहे. रेल्वे फाटक ओलांडताना पंधरवडय़ातून किमान एका व्यक्तीला प्राण गमवावे लागत आहेत. सिडकोने रेल्वे स्थानके बांधल्यानंतर भुयारी मार्ग बांधणे आवश्यक होते. मात्र तसे न झाल्याने नवी मुंबईतील नागरिकांना धोकादायक रेल्वे फाटकांशी सामाना करावा लागत आहे. रेल्वे प्रशासनाने मात्र रेल्वे रुळ ओलांडू नका, अशा आशयाचे फलक उभारुन जबाबदारी झटकली आहे.  ऐरोली नाका, तुभ्रे नाका, रबाळे येथील नागरिक पूर्व आणि पश्चिमकडे ये-जा करण्यासाठी रेल्वे फाटकांचा वापर करतात. या रेल्वे फाटकातून जात असताना काही ठिकाणी नेहमीच अपघात होत असतात. ठाणे-वाशी मार्गावर रेल्वे लाइन टाकण्याचे काम रेल्वेने केले आहे. तर, नवी मुंबईतील रेल्वे स्थानके सिडकोने निर्माण केली आहेत. शहराचा नियोजनबद्ध विकास करताना आवश्यक त्या ठिकाणी पादचारी पूल किंवा भूयारी मार्ग निर्माण करणे आवश्यक असताना सिडकोने मात्र ती तसदी घेतलेली नाही. रेल्वे प्रशासनानेदेखील या बाबतीत सिडकोच्या पावलावर पाऊल ठेवले आहे.

पादचारी पूल बंद

दहशतवादी हल्ल्याचे कारण पुढे करत ऐरोली येथील महावितरण कॉलनी परिसरातील रेल्वे रुळ ओलांडण्यासाठी बांधण्यात आलेला पादचारी पूल बंद करण्यात आला आहे. त्यामुळे महावितरण वसाहतीतील नागरिकांना ऐरोली नाक्याला वळसा घालून ये-जा करावी लागते. या पुलावर आता गर्दुल्ल्यांचे बस्तान बसले असून सुरक्षा यंत्रणा उभारुन हा पूल पुन्हा सुरू करण्याची मागणी नागरिक करत आहेत.

ठाणे-बेलापूर मार्गावरील एमआयडीसीमध्ये जाण्यासाठी रेल्वेने रबाळे येथे पूल उभारला नसल्याने पूर्ण वळसा घालून जावे लागते. त्यामुळे वेळ वाचवण्यासाठी काही जण रेल्वे रुळ ओलांडणे पसंत करतात.
-अर्जुन भोसले

रेल्वेने पादचाऱ्यांना रुळ ओलांडण्यासाठी पादचारी पूल बांधून दिले आहेत. मात्र या पादचारी पुलांवर गर्दुल्ले व मद्यपि बसत असल्यामुळे नाईलाजास्तव रेल्वे फाटक ओलांडून जावे लागते.
-पूजा काळे