प्रवाशांची रोजच दैना; ‘ट्रान्स हार्बर’च्या संथगतीचा फटका, झोपडय़ांचा विळखा
नवी मुंबई शहरामध्ये महापालिकेच्या हद्दीतील १२ लाख लोकसंख्या वास्तव्यास आहे. त्यांच्या प्रवासाच्या दृष्टीने असलेली रेल्वे प्रवासी सेवा अनेक समस्यांनी गुरफटली गेल्याने त्यांचा त्रास येथील नोकरदार वर्गाला सहन करावा लागत आहे. मुंबई व आसपासच्या उपनगरात नोकरी व कामानिमित्त मोठय़ा संख्येने नोकरदार जातात. त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असून कोटय़वधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेली ही आलिशान रेल्वेस्थानके समस्यांची आगार बनली आहेत.
नवी मुंबईकडे येण्यासाठी किंवा जाण्यासाठी पनवेल ते मुंबई आणि वाशी ते ठाणे असा ट्रान्स हार्बर मार्ग तयार करण्यात आला आहे. या मार्गावर १५ रेल्वे स्थानके आहेत. नवी मुंबईतील या रेल्वे स्थानकांवर ९०० कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. मात्र ऐरोलीनजीक रेल्वेची वेगमर्यादा झोपडी वसाहतीमुळे मंद ठेवावी लागते. ठाणे वाशी मार्गावरील अवघ्या १७ मिनिटांच्या प्रवासासाठी अनेक त्रासांना सामोरे जावे लागते.
सुरक्षेचा प्रश्न
रबाळे रेल्वे स्थानकांच्या जवळपास लोकल थांबली असताना एका महिलेची पर्स खेचण्यात आली होती. अचानक लोकल सुरू झाल्यावर ही महिला धावत्या लोकलमधून खाली पडल्याने उपचारादरम्यान सदर महिलेला जीव गमवावा लागला होता. तर अशाच प्रकारच्या एका घटनेत एका महाविद्यालयीन तरुणाला प्रवासाच्या दरम्यान गुर्दुल्ल्यांनी केलेल्या हल्ल्यात प्राण गमवावे लागले होते. तर कोपरखरणे रेल्वे स्थानकाच्या मागील बाजूस अमली पदार्थ सेवन करणाऱ्या तरुणांचा घोळका नेहमीच बसलेला असतो. मात्र पुरेशा पोलीस बळाअभावी अशा अपप्रवृत्तींना अटकाव केला जात नाही.
रुळ ओलांडणाऱ्यांवर नियंत्रण
रेल्वे मार्गालगत संरक्षण भिंत बांधल्यानंतरदेखील नागरिक रेल्वे मार्ग ओलांडून जातात. परिणामी या नागरिकांना जीव गमवावा लागतो. यासाठी ठोस उपाययोजना झाल्या पाहिजेत असे प्रवाशांचे म्हणणे आहे.
झोपडपट्टय़ांचे अतिक्रमण
मतुभ्रे रेल्वे स्थानकालगत फेरीवाल्यांचा व झोपडय़ांचा विळखा पडला असून त्यावर कारवाई करण्याचे टाळले जात आहे.
शौचालयांची दुरवस्था झाली आहे. करोडो रुपये खर्चून बांधलेल्या रेल्वे स्थानकामधील सार्वजनिक शौचालय देखभालअभावी दरुगधीमय झाली आहे.
सुविधांचा अभाव
इंडिकेटर, अपुऱ्या तिकीट खिडक्या या समस्या सुरुवातीपासून जैसे थे तशाच आहेत. अपंग प्रवशांकडून स्वतंत्र मार्गिका ठेवण्यात आल्या नाही, त्यामुळे अपंग प्रवाशाचे हाल होत आहे. तसेच वाशी- ठाणे रेल्वे मार्गावर पिण्याच्या पाण्याची व खाद्यपदार्थाच्या स्टॉलची समस्या सर्वच रेल्वे स्थानकांवर आहे. अनेक पंखे नादुरुस्त असल्याने प्रवाशांना रणरणत्या उन्हात रेल्वेची प्रतीक्षा करावी लागते. तरी रेल्वे प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.