बेलापूर, आयकर कॉलनीदरम्यान जीवघेणा प्रवास

बेलापूर गाव व त्यालगतच्या रेल्वेमार्गापलीकडे असलेल्या आयकर कॉलनीदरम्यानच्या रेल्वे पादचारी पुलाचे काम अनेक वर्षांपासून रखडले आहे. या पुलाचा प्रस्ताव महासभेत मंजूर झाला आहे. पालिकेनेही रेल्वेकडे पाठपुरावा करून पुलाच्या आराखडय़ासह ४ कोटींची रक्कमही दिली आहे. आजवर येथील रूळ ओलांडताना १८ जणांना जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे रेल्वे आणखी किती जणांच्या मृत्यूची वाट पाहत  आहे, असा प्रश्न येथील रहिवाशांना पडला आहे.

बेलापूर हे नवी मुंबईतील मूळ प्रकल्पग्रस्त गावांमधील प्रसिद्ध गाव आहे. पारसिक टेकडीच्या पायथ्याशी असलेल्या या मूळ गावात पूर्वी मुख्य बाजारपेठ होती. आजही आजूबाजूच्या गावांतील ग्राहक येथे खरेदीसाठी येतात.

शहराचा विकास झाला आणि आजूबाजूची लोकसंख्या झपाटय़ाने वाढली. पारसिक हिलच्या पायथ्याशी आयकर वसाहत वसलेली आहे. गाव व वसाहतीमधून हार्बर रेल्वेमार्ग गेल्याने या दोन्ही ठिकाणच्या नागरिकांना ये-जा करण्यात अडचण निर्माण झाली आहे. आयकर वसाहतीतील अनेक जण जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी आणि अनेक विद्यार्थी शाळेसाठी बेलापूर गावात जातात. असे हजारो रहिवासी रोज रेल्वेमार्ग ओलांडतात आणि अपघात घडतात.

येथे पादचारी पूल किंवा भुयारी मार्ग व्हावा यासाठी रेल्वे रोके, रास्ता रोको आंदोलने झाली आहेत. सुरुवातीला येथे भुयारी मार्ग बांधण्यासाठी पालिकेने प्रयत्न केला. त्यासाठी रेल्वेकडे ३० लाख रुपयेही भरले होते. परंतु रेल्वेच्या पाहणीनंतर येथील भूभाग भुयारी मार्गाच्या बांधणीसाठी योग्य नसल्याचा अहवाल रेल्वेने दिला. त्यानंतर या ठिकाणी पादचारी पूल बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. महापालिकेत पादचारी पुलासाठी चार कोटी अडुसष्ठ लाख रुपयांचा प्रस्तावही मंजूर केला.

खासदार राजन विचारे यांच्यासोबत पालिका व रेल्वे अधिकाऱ्यांची नुकतीच बैठक झाली. त्यामध्येही बेलापूरजवळील पादचारी पुलाबाबत चर्चा झाली. त्यामुळे पादचारी पुलाचे काम दृष्टिपथात आल्याचे मानले जात आहे.

या पुलाच्या बांधणीसाठी माजी खासदार संजीव नाईक व विद्यमान खासदार राजन विचारे यांनी रेल्वेकडे पाठपुरावा केला होता. बेलापूर गावचे माजी नगरसेवक अमित पाटील, स्थानिक नगरसेविका पूनम पाटील, तसेच शिवसेनेच्या नगरसेविका सरोज पाटील, रोहिदास पाटील यांनीही सातत्याने या पुलासाठी पाठपुरावा केला आहे.

महापालिकेने रेल्वेच्या सहकार्याने येथे रेल्वे पादचारी पूल बांधण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला आहे. पालिकेने चार कोटी ६८ लाखांचा प्रस्ताव मंजूर केला आहे. रेल्वेने लवकर पूल बांधावा
– सरोज पाटील, स्थानिक नगरसेविका

भुयारी मार्ग बांधणे शक्य नसल्याने पादचारी पुलाचा पर्याय स्वीकारण्यात आला, मात्र रेल्वेमार्ग ओलांडताना १८ जणांचा मृत्यू झाल्यानंतरही रेल्वे याविषयी उदासीन आहे. रेल्वेने व पालिकेने ल्लवकर पादचारी पुलाचे काम सुरू करावे.
– अमित पाटील, माजी नगरसेवक, बेलापूर

या पुलाबाबत अनेक वेळा रेल्वे अधिकाऱ्यांबरोबर बैठका झाल्या आहेत. पालिकेने रेल्वेकडे पैसेही भरले आहेत. त्यामुळे रेल्वेने तात्काळ या पुलाचे काम सुरू करावे.
 -राजन विचारे, खासदार

महापालिकेने या ठिकाणी पादचारी पूल बनविण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. रेल्वेकडे ४ कोटी रुपये भरले आहेत. पालिकेने आपले काम केले आहे. आता रेल्वेने येथील कामाला तात्काळ सुरुवात करावी.
– मोहन डगावकर, शहर अभियंता, नमुंमपा