बेलापूर गाव आणि आयकर कॉलनीला जोडणाऱ्या रेल्वे पादचारी पुलाच्या कामांचा शुभारंभ

बेलापूर गाव आणि त्याच्या विरुद्ध बाजूला रेल्वेमार्गालगत असलेल्या पारसिक हिलच्या पायथ्याशी असलेल्या आयकर कॉलनीतील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. कारण या भागाला जोडणाऱ्या रेल्वे पादचारी पुलाच्या कामाचा रविवारी खासदार राजन विचारे, स्थानिक नगरसेविका सरोज पाटील आणि विविध पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शुभारंभ झाला. या पुलाचे काम सुरू झाल्यामुळे रेल्वे रुळ ओलांडण्याची जीवघेणी कसरत थांबणार आहे.

बेलापूर गाव आणि आयकर कॉलनी यांच्या मधून जाणारा रेल्वेमार्ग ओलांडताना आतापर्यंत जवळजवळ १८ जण मृत्युमुखी पडले आहेत. त्यामुळे या पुलाचे काम कधी सुरू करणार की अजूनही नागरिकांच्या मृत्यूची वाट बघितली जाणार असा सवाल नागरिकांककडून उपस्थित होत होता. कारण या पुलांच्या प्रस्तावाला महासभेत मंजुरी मिळाली होती. तसेच या पुलाचा आराखडा आणि ४ कोंटीचा धनादेशही पालिकेने रेल्वेला दिला होता. तरीही या पुलाच्या उभारणीचे गांभीर्य रेल्वेकडून दाखवण्यात येत नव्हते. त्यामुळे बेलापूर गाव आणि आयकर कॉलनी वसाहत यांच्यातील या हार्बर रेल्वेमार्गाने नागरिकांना मोठय़ा अडचणींना सामोरे जावे लागत होते. आयकर वसाहतीतील रहिवाशांना आजही जीवनावश्यक वस्तूच्या खरेदीसाठी, विद्यार्थ्यांना शाळेसाठी याच मार्गावरून ये-जा करावी लागत होती. यामुळे या ठिकाणी पादचारी पूल किंवा भुयारी मार्ग उभारावा, या मागणीसाठी रेल, रास्ता रोको अशी आंदोलनेही झाली होती. या समस्येबाबत माजी खासदार संजीव नाईक आणि विद्यमान खासदार राजन विचारे यांच्याकडे स्थानिक नगरसेविका सरोज पाटील यांनी पाठपुरावा केला होता. सुरुवातीला येथे भुयारी मार्ग बांधण्यासाठी पालिकेने प्रयत्न केले होते. त्यासाठी ३० लाखांचा निधीही रेल्वेला देण्यात आला होता. परंतु रेल्वेच्या पाहणीनंतर याठिकाणी भूभागाची भौगोलिक रचना नीट नसल्याने तांत्रिक अडचणींमुळे हा भुयारी मार्ग बांधता येणार नसल्याचा अहवाल रेल्वेने दिला होता. त्यामुळे या ठिकाणी पादचारी पूल बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी पालिकेने चार कोटी ६८ लाखांचा प्रस्तावही मंजूर केला होता. काही दिवसांपूर्वी खासदार राजन विचारे यांनी पालिका आणि रेल्वे अधिकाऱ्यांची पुलाचे काम सुरू करण्याबाबत बैठक घेतली. त्यानंतर या पुलाच्या कामाचा शुभारंभ रविवारी करण्यात आला.

१८ जणांचे प्राण गेले

आयकर कॉलनी ते बेलापूर येथे जाण्यासाठी रेल्वेमार्ग ओलांडावा लागतो. अन्यथा दोन किलोमीटर दूर असलेल्या बेलापूर रेल्वे स्थानकाला वळसा घालून जावे लागते. त्यामुळे पादचारी पुलाची सोय नसल्याने नागरिक रेल्वेमार्ग ओलांडत होते. यात आतापर्यंत १८ नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले होते.

या पादचारी पुलाबाबत अनेक वेळा रेल्वे अधिकाऱ्यांशी बैठका झाल्या होत्या. स्थानिक नागरिक आणि नगरसेविका सरोज पाटील यांनाही यासंबंधी पाठपुरावा केला होता. अखेरीस या पुलाच्या कामाला सुरुवात झाली असून एप्रिलपर्यंत हा पादचारी पूल पूर्ण होईल.

 -राजन विचारे, खासदार

अनेक वर्षांपासून आम्ही रेल्वे रूळ ओलांडून बेलापूर गावात जात होतो. शाळेतील मुलेही रेल्वे रूळ ओलांडून जात होते. त्यामुळे अनेक वेळा अपघातही झाले आहेत. त्यामुळे प्रत्यक्षात आता या पादचारी पुलाच्या कामाला सुरुवात झाल्यामुळे आयकर कॉलनीतील सर्व रहिवाशांमध्ये समाधान आहे.

-गोविंद थोरात, रहिवासी, आयकर कॉलनी.