फळभाज्यांची लागवड केलेल्या शेतकऱ्यांना परतीच्या पावसाचा जोरदार फटका बसला आहे. आठ दिवसांपासून ते आठ आठवडय़ांपर्यंत पिकणाऱ्या भाज्यांवरच उदरनिर्वाह करणाऱ्या शेतकऱ्यांना हा परतीचा पाऊस नकोसा झाला आहे. त्यामुळे मुंबईला भाजीपुरवठा करणाऱ्या तुर्भे येथील एपीएमसी घाऊक बाजारपेठेत भाज्यांची आवक गेल्या आठवडय़ात अचानक रोडावली. सोमवारी सहाशे गाडय़ांची आवक झाली, मात्र भाजी बाजारासाठी येणारा काळ कठीण असल्याचे शेतकरी सांगत आहेत.
राज्यात कोकण, पश्चिम, उत्तर भागात काही ठिकाणी संध्याकाळी दररोज परतीचा पाऊस  पडत आहे. सप्टेंबर सरल्यामुळे शेतकऱ्यांच्या दृष्टीने हा अवकाळी पाऊसच समजला जात आहे. त्यामुळे शेती उत्पन्न काढण्याची वेळ आलेली असताना परतीच्या पावसाने अनेक ठिकाणी पिकलेल्या शेतीवर घाला घातला आहे. कोकणात गेले दोन दिवस परतीचा मुसळधार पाऊस कोसळत असल्याने भाताच्या उभ्या लोंबी आडव्या झाल्या आहेत, तर उत्तर व पश्चिम महाराष्ट्रात भाज्यांच्या उत्पन्नावर संकट उभे राहिले आहे. फळभाज्यांच्या लागवडीलाही याचा फटका बसला आहे. मुंबई आणि आजूबाजूच्या परिसराला भाजीपुरवठा करणाऱ्या एपीएमसी बाजारात गुरुवार, शुक्रवार, आणि शनिवारी केवळ चारशे गाडय़ा भरून भाजी आल्याची नोंद आहे. त्याच्या परिणामी मुंबई, ठाणे, नवी मुंबईत भाज्यांचे दर कडाडले.
रविवारी बाजार बंद असल्याने सोमवारी ही आवक पुन्हा वाढल्याचे दिसून आले. सव्वा पाचशे गाडय़ा भरून भाजी येण्याची अपेक्षा असताना ती ६०० पर्यंत आली आहे.
त्यामुळे सोमवारी घाऊक बाजारातील भाव स्थिरावण्यास मदत झाली. नाशिक, नगर भागातून येणाऱ्या टोमॅटोचा दर मध्यंतरी २० रुपये किलोपर्यंत गेला होता, पण आज तो १२ ते १४ रुपयेपर्यंत स्थिरावला आहे. हीच स्थिती कोबी, फ्लॉवर, भेंडी, मिरची या भाज्यांच्या बाबतीत असून पाच ते पंधरा रुपये किलोने या भाज्या बाजारात उपलब्ध आहेत.