पावसामुळे सिमेंट वाहून गेल्याने अंतर्गत रस्त्यांवर खड्डे

शुक्रवारपासून मंगळवापर्यंत पडलेल्या मुसळधार पावसामुळे नवी मुंबईतील औद्योगिक वसाहतीतील अंतर्गत रस्त्याची पुरती चाळण झाली आहे. रबाळे, महापे, शिरवणे, खैरणे भागांतील अनेक कारखान्यांसमोर मंगळवारी तळी साचली होती. नवी मुंबईतील औद्योगिक वसाहतीत पालिकने अद्याप पावसाळी गटार योजना न राबविल्याने डोंगरातून येणारे सर्व पाणी औद्योगिक वसाहतीत जमा होत आहे. या अंर्तगत रस्त्याची डागडुजी पालिका करणार नाही, असे स्पष्ट करण्यात आल्याने हा तिढा निर्माण झाला आहे. एमआयडीसीने हे रस्ते  दुरुस्त करण्याचे आश्वासन दिले आहे, पण ते अद्याप पूर्ण केलेले नाही.

नवी मुंबईत दिघा, रबाळे, महापे, खैरणे, पावणे, तुर्भे, शिरवणे भागांत औद्योगिक वसाहत असून तिथे अडीच हजारांपेक्षा जास्त कारखाने आहेत. पालिकेचे ७० टक्के उत्पन्न या औद्योगिक वसाहतीतून जमा होते. यात मालमत्ता कराचा मोठा वाटा असतो, मात्र पालिका या उद्योजकांना हव्या तशा सुविधा देत नाही. गेल्या वर्षी पालिकेने दिघा ते महापे व महापे ते शिरवणे येथील मुख्य रस्त्याचे क्राँक्रिटीकरण केले, पण याच मार्गावरून कारखान्यांकडे जाणाऱ्या अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. मंगळवारी पडलेल्या मुसळधार पावसात या अंतर्गत रस्त्यांवर तळी साचली होती. त्यामुळे अनेक कारखान्यांना लागणारा कच्चा माल पोहोचू शकला नाही.

नवी मुंबई औद्योगिक वसाहतीला खेटून पारसिक डोंगरांच्या रांगा आहेत. या डोंगरातून येणाऱ्या पाण्याला समुद्राकडे नेण्यासाठी पावसाळी नाला बांधणे आवश्यक आहे. जे पावसाळी नाले अस्तित्वात आहेत, ते गेली अनेक वर्षे साफ न केल्याने बुजले आहेत. त्यामुळे या डोंगरांमधून येणारे पाणी औद्योगिक वसाहतीतील रस्त्यांवर साचते. त्यामुळे हे रस्ते नेहमीच खड्डय़ांनी ग्रासलेले असतात.

नवी मुंबई पालिकेने हे रस्ते दुरुस्त करण्यास नकार दिला असून अंतर्गत सुविधा एमआयडीसीने पुरविणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे या ७८ किलोमीटरच्या रस्त्यांना कोणी वाली नसल्याचे दिसून येते.

मुसरळधार पावसामुळे नवी मुंबईतील औद्योगिक वसाहतीतील अंतर्गत रस्त्यांची चाळण झाली आहे. हे रस्ते खराब आहेत. त्यात पावसामुळे प्रत्येक कारखान्याच्या समोर तळी साचली आहेत. एमआयडीसीने हे रस्ते दुरुस्त करण्याचे आश्वासन दिले आहे. पावसाळ्यानंतर रस्त्यांची पुनर्बाधणी न झाल्यास आंदोलन करण्यात येईल.

– के. आर. गोपी, अध्यक्ष, स्मॉल स्केल आंत्रप्रेनर्स, नवी मुंबई</strong>