शेजारील गृहप्रकल्पांतील खोदकामांमुळे संकुलात गुडघाभर पाणी

पनवेल : सिडकोने खारघर येथील सेक्टर-३६ मध्ये उभारलेल्या ‘स्वप्नपूर्ती’ गृहसंकुलात पावसाचे पाणी शिरल्याने रहिवाशांना मोठय़ा अडचणींचा सामना करावा लागला. शनिवारी दुपारपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे ‘स्वप्नपूर्ती’ संकुलात गुडघाभर पाणी तुंबले होते. रविवारी रात्रीपर्यंत या पाण्याचा निचरा झालेला नव्हता. रहिवाशांनी पहिल्या दिवशी या प्रकाराची माहिती सिडकोच्या अधिकाऱ्यांना दिली. मात्र, तक्रारींची नोंद घेणारी सिडकोची कोणतीही यंत्रणा जागेवर नसल्याने पाण्याचा उपसा करणे शक्य झाले नाही. गेल्या वर्षीही स्वप्नपूर्ती गृहसंकुलात पाणी तुंबले होते. त्यामुळे या समस्येवर यंदा तरी सिडको अधिकारी तोडगा काढतील, ही रहिवाशांची अपेक्षा फोल ठरली आहे.

गृहसंकुलाच्या संरक्षक भिंतीला भेदून पावसाचे पाणी आत शिरत आहे. शनिवारी आणि रविवारी पाण्याचा लोंढा सुरूच राहिल्याने येथील वाहने गुडघाभर पाण्याखाली गेली. पावसाळी पाण्याचा निचरा व्हावा, यासाठी पर्जन्यजल वाहिन्या उभारल्या आहेत, परंतु ‘स्वप्नपूर्ती’ गृहप्रकल्पाशेजारी उभा राहत असलेल्या गृहप्रकल्पात खोदकामे सुरू असल्याने काही ठिकाणी खदानीच्या आकाराचे खड्डे तयार झाले आहेत. यात पावसाचे पाणी तुंबून ते बाहेर पडत आहे.यात अनेक ठिकाणी ‘स्वप्नपूर्ती’च्या संरक्षक भिंतीला भेदून पाणी येत असल्याची माहिती रहिवाशांनी दिली.

या संदर्भात सिडकोच्या अधिकाऱ्यांनी हात वर केले आहेत. गृहप्रकल्पात पाणी तुंबण्याचा प्रश्नच नाही. सध्या पावसाचे पाणी हे बाहेरील गृहप्रकल्पासाठी केलेल्या खोदकामाच्या ठिकाणातून ‘स्वप्नपूर्ती’त येत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

‘एमएमआरडीएकडे पाठपुरावा नाही’

रहिवाशांच्या तक्रारी ऐकून घेण्यास अधिकारीच जागेवर नसल्याने दोन दिवस पाणी स्वप्नपूर्तीत तसेच तुंबून होते. अखेर काही वृत्तवाहिन्यांमध्ये त्याबाबत माहिती आल्यानंतर सिडको अभियंत्यांनी रविवारी रात्री उशिरा पंप लावून पाण्याचा उपसा सुरू केला. सिडकोने उभारलेल्या प्रकल्पांपैकी काही प्रकल्पांचा ताबा अद्याप पालिकेकडे दिलेला नाही. खारघर वसाहतीचे नियोजन प्राधिकरणाचे अधिकार स्वत:कडे ठेवले आहेत. याशिवाय ‘एमएमआरडीए’ क्षेत्रातील प्रकल्पांमधील नियोजन करण्यासाठी सिडकोने पाठपुरावा केला असता तर स्वप्नपूर्तीत सलग दुसऱ्या वर्षी पाणी तुंबण्याची वेळ आली नसती, अशी प्रतिक्रिया संकुलातील रहिवाशी करीत आहेत.

एमएमआरडीए गृहनिर्माण योजनेच्या शेजारील प्रकल्पातून हे पाणी स्वप्नपूर्तीमध्ये शिरले आहे. ते क्षेत्र एमएमआरडीएच्या अंतर्गत आहे. तेथे काही खासगी बांधकामे सुरू आहेत. तेथून पाणी स्वप्नपूर्ती योजनेकडे वळविण्यात आले आहे आणि त्यामुळे पावसाळी पाणी साचले आहे. आम्ही तातडीने आवश्यक कारवाईसाठी पनवेल पालिकेच्या शहर अभियंत्यांना कळविले आहे. संबंधित क्षेत्र आता त्यांच्या अधिकार क्षेत्रात आहे. स्वप्नपूर्ती योजनेतील पाणी काढण्यासाठी मोटार पंपची सोय करून ते पाणी पावसाळी नाल्यांमध्ये वळविले आहे.

– प्रिया रातांबे, जनसंपर्क अधिकारी, सिडको