पनवेलमधील संस्था, संघटनांनी परिसरातील विविध समस्यांचे गाऱ्हाणे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे मांडले. गुरुवारी पनवेलमधील विविध सामाजिक संघटना संस्था पदाधिकाऱ्यांच्या राज ठाकरे यांनी भेटी घेतल्या. यामध्ये आधार फाउंडेशन, अबोली महिला रिक्षा संघटना, पनवेल संघर्ष समितीचा समावेश होता.

पनवेल शहराला भविष्यात अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागणार असून रेल्वे स्थानक परिसर तसेच पनवेलमध्ये सुरू असलेले अवैध धंदे, पनवेलकरांच्या विविध समस्यांचे पत्र आधार फाऊंडेशनमार्फत देण्यात आले.

अबोली महिला रिक्षा संघटनेच्या सर्व महिला रिक्षाचालक यांनी निवेदनाद्वारे गरजू महिलांकरीता ऑटो रिक्षाची मागणी करण्यात आली, शेतकऱ्यांवर लादलेल्या नैना प्रकल्पाला मूठमाती देण्यासाठी प्रकल्पबाधित शेतकरी उत्कर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पनवेल संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांच्यासह राज ठाकरे यांची भेट घेतली.  सिडको आणि राज्य शासनाने शेतकऱ्यांचे उदरनिर्वाहाचे साधन असलेली शेतजमीन फुकटात लाटत विकासाचे फसवे स्वप्न त्यांना दाखविले असल्याची माहिती कडू यांनी ठाकरे यांना दिली. त्याविषयी शेतकरी उत्कर्ष समिती आणि पनवेल संघर्ष समितीने दोन वेगवेगळे निवेदने देवून पनवेल तालुक्यातील २३ गावांतील नैनाबाधित शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्याचे त्यांनी सांगितले. मांडलेल्या समस्यांची दखल घेत त्यावर मार्ग काढण्याचे आश्वासन राज ठाकरे यांनी येथील संस्था, संघटनांना दिले आहे.

उरण परिसरातील शेतकऱ्यांसमोर अनेक प्रश्न असून त्याला येथील शेतकरीच जबाबदार आहेत. आपल्या जमिनींची विक्री करून त्यांनी चूक केली, असे राज ठाकरे यांनी गुरुवारी व्यक्त केले. राज्य दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात त्यांनी उरणला भेट दिली, तेव्हा ते पत्रकारांशी ते बोलत होते.

उरणमध्ये सिडको तसेच खाजगी विकासकांनी जमिनी संपादीत केल्याने तसेच विकत घेतल्याने येथील शेतकऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यावर शेतकऱ्यांनी आपल्या जमीनींची कवडी मोलाने विक्री केल्याने या समस्या निर्माण झाल्या आहेत, असे मत राज यांनी व्यक्त केले.