नवी मुंबई : टोल नाक्यावर होणाऱ्या पथकर वसुलीबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेल्या प्रक्षोभक भाषणप्रकरणी गुरुवारी वाशी न्यायालयात सुनावणी झाली असून न्यायालयाने त्यांना ६ फेब्रुवारी रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

२६ जानेवारी २०१४ रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पथकर वसुलीत कथित भ्रष्टाचाराचा आरोप करीत प्रक्षोभक भाषण केले होते. त्यानंतर मनसे पदाधिकारी व कार्यकत्र्यांनी टोल नाक्यांवर आंदोलने केली होती. या प्रकरणी राज ठाकरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याचे समन्स १८ ऑगस्ट २०१८ रोजी त्यांनी स्विकारले, मात्र ते न्यायालयात हजर राहू शकले नव्हते. त्यानंतर २० फेब्रुवारी २०२० ला पुन्हा समन्स बजावण्यात आले होते. मात्र मार्चपासून करोनासंसर्ग वाढल्याने टाळेबंदी लागू करण्यात आली. त्यामुळे या प्रकरणाची सुनावणी लांबणीवर पडली होती.  न्यायालयाचे कामकाज पूर्वपदावर आल्यानंतर ६ जानेवारी रोजी त्यांना  पुन्हा समन्स बजावण्यात आले होते. वॉरंट रद्द करण्यासाठी त्यांच्या वकिलांनी अर्ज केला होता. मात्र गुरुवारी झालेल्या सुनावणीत राज ठाकरे यांना ६ फेब्रुवारी रोजी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती ठाकरे यांचे वकील नीलेश बागडे यांनी दिली.