सीमा भोईर

गतवर्षीच्या तुलनेत किमतीत पाच-दहा रुपयांची वाढ

रक्षाबंधनाचा सण उद्यावर आला असताना पनवेलमधील बाजारांत राख्या खरेदीसाठी गर्दी झाली आहे. कुंदन, मोती, विणकामाच्या राख्यांना मोठी मागणी आहे. लहान मुलांसाठी कार्टूनच्या राख्या खरेदी करणाऱ्यांचे प्रमाणही मोठे आहे. किमतींत पाच-दहा रुपयांची वाढ झाली आहे.

विविध प्रकारच्या, रंगीबेरंगी राख्यांनी बाजार सजले आहेत. पाच ते ५०० रुपयांपर्यंतच्या राख्या उपलब्ध आहेत. फुलांच्या नक्षीवर खडे, कुंदन, विणकाम केलेल्या राख्यांना अधिक मागणी आहे. जुन्या पद्धतीच्या गोंडय़ाच्या राख्या नव्या रूपात आल्या आहेत. आकर्षक नक्षीकाम असलेल्या गुजराती व राजस्थानी पद्धतीच्या राख्या, ओम, स्वस्तिक, सरस्वती, सूर्य अशी नक्षी असलेल्या राख्या ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत. जरीची राखी मोत्याची राखी, नाण्याची राखी या नवीन राख्या यंदा उपलब्ध आहेत. त्यांची किंमत ५० ते ८० रुपयांपर्यंत आहे. नक्षीकाम केलेल्या राख्या बंगालमधून मागवण्यात आल्या आहेत, जरीच्या राख्यांची किंमत ७० रुपये इतकी असून गोंडा, फुल, स्टीलच्या जुन्या प्रकारच्याही राख्याही उपलब्ध आहेत. सोनेरी रंगाच्या, देवतांची चित्रे असलेल्या राख्याही विक्रीस असून लक्ष्य वेधून घेत आहेत. ९० ते ३०० रुपयांना या राख्या उपलब्ध आहेत. ऑनलाइन साइट्सवरही राख्या उपलब्ध आहेत.

काही ब्रँड्सनीही अनोख्या राख्या उपलब्ध करून दिल्या असून त्यांनाही विशेष पसंती मिळत आहे. भावाचे नाव लिहून आणि धाग्यात गुंफलेल्या राखीला विशेष मागणीही आहे, अ‍ॅक्रेलिक, लाकूड इत्यादींच्या राख्या उपलब्ध आहेत. त्यांच्या किमती साधारण १५० ते २५०च्या दरम्यान आहेत. राख्या ऑनलाइनही विकण्यात येत आहेत आणि त्यालाही उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

लहान मुलांमध्ये मोटू-पतलू, छोटा भीम, बालगणेश, डोरेमॉन, शिनचॅन या कार्टूनच्या आणि स्पिनरच्या राख्या खरेदी केल्या जात आहेत. प्लास्टिक बंदीमुळे राख्या कागदात गुंडाळून दिल्या जात आहेत.

हल्ली छोटय़ा राख्यांना ग्राहकांची पसंती मिळत आहे. राखीसाठी लागणारे रेशीम व कुंदन  महागले आहे. मजुरीही वाढली आहे. राखीच्या किमतीत गतवर्षीच्या तुलनेत ५ ते ७ रुपयांची वाढ झाली आहे, मात्र ग्राहकांचीही त्याबद्दल तक्रार नाही.

– संजय चौधरी, राखी विक्रेते