नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत शहरात जनजागृती रॅली काढण्यात आली. यावेळी आदिवासी कुटुंबीयांना वैयक्तिक शौचालय अनुदान पत्रे वितरण करण्यात आली. एम्पथी फांऊडेशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी कॅन्सर तपासणी शिबीर तसेच महानगरपालिकेच्या वाहनचालकांकरिता मोफत आरोग्य व नेत्र तपासणी आणि चष्मे वाटप शिबिराचे आयोजन यावेळी करण्यात आले होते.
दीड हजारहून अधिक विद्यार्थी हागणदारीमुक्त शहराचा प्रचार करत जनजागृती रॅलीत घोषणा देत उत्साहाने सहभागी झाले होते. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने ठिकठिकाणी सार्वजनिक व सामूहिक शौचालये उभारली जात असून केंद्र व राज्य शासनाच्या वतीने वैयक्तिक शौचालयासाठी देण्यात येणाऱ्या १२ हजार रुपयांच्या अनुदानामध्ये महानगरपालिकाही ५ हजार रुपये देत असल्याची माहिती महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली असून, योजनेचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा व आपले शहर हागणदारीमुक्त करण्यासाठी संपूर्ण योगदान द्यावे, तसेच या कामी महिला बचत गटांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी महापौर सुधाकर सोनावणे, क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम समिती सभापती प्रकाश मोरे, आरोग्य समिती सभापती पूनम पाटील आदी उपस्थित होते.