19 January 2021

News Flash

राममंदिर निधी संकलनाद्वारे मतांचे ध्रुवीकरण

नवी मुंबई पालिकेची निवडणूक काही दिवसांत होणार असून त्याची तयारी सर्वच राजकीय पक्षांनी सुरू केली आहे.

(संग्रहित छायाचित्र)

नवी मुंबईत भाजपच मोहीम

नवी मुंबई : आयोध्येत उभारण्यात येत असलेल्या राम मंदिरासाठी श्री राम जन्मभूमी तीर्थश्रेत्र न्यासाच्या वतीने देशात सर्वत्र शुक्रवारपासून निधी संकलन केले जाणार असून नवी मुंबईत नुकतीच या समितीची एक शाखा नेरुळ येथे सुरू करण्यात आली आहे. नवी मुंबई पालिकेची निवडणूक काही दिवसांत होणार असून त्याची तयारी सर्वच राजकीय पक्षांनी सुरू केली आहे. भाजपने सर्वच इच्छूक उमेदवारांनी या श्री राम मंदिर निधी संकलनानिमित्ताने नवी मुंबईतील प्रत्येक हिंदू घरात जाऊन मतदारांशी संर्पक साधण्याचा सल्ला दिला आहे.

लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी संघाच्या मतदारसंघ संपर्काचे कौतुक केले होते. नवी मुंबई पालिकेतील निवडणूक कोणत्याही क्षणी जाहीर होईल या दृष्टीने भाजपने तयारी सुरू केली असून त्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रचारकाची साथ मिळत आहे. या निवडणुकीसाठी भाजपाने आमदार अ‍ॅड. अशिष शेलार यांची प्रभारी नियुक्ती केली असून दोन आमदारांना प्रमुख जाहीर केले आहे. बुधवारी या दोन आमदारांसह तिसरे विधान परिषद आमदार रमेश पाटील यांच्या भेटीगाठी घेऊन शेलार यांनी निवडणुकीचा आढावा घेतला आहे. संध्याकाळी शिरवणे येथील एका शाळेत शहरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली असून त्यात निवडणूक व्यहूरचना ठरविण्यात आली आहे. उत्तर प्रदेशातील आयोध्या येथे नोव्हेंबरमध्ये भव्य श्री राम मंदिर उभारणीचे काम सुरू झाले आहे. त्यासाठी कोट्यवधी रुपये लागणार असून देशातील हिंदूचा या उभारणीत वाटा असावा यासाठी श्री राम जन्मभूमी तीर्थ श्रेत्र न्यास तयार करण्यात आला असून त्याच्या संपूर्ण देशात शाखा सुरू करण्यात आलेल्या आहेत. १५ जानेवारी ते २७ फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या या श्री राम जन्म भूमी मंदिर निधी संकलन अभियानासाठी नवी मुंबईत नेरुळ येथे एक शाखा सुरू करण्यात आली असून या निधी संकलनाच्या निमित्ताने सर्व हिंदू घरात भाजप कार्यकत्र्यांना पोहचता येणार आहे. नवी मुंबई पालिकेची लोकसंख्या १६ लाखांपर्यंत पोहचली असून यात ८० टक्के हिंदू नागरिक आहेत. त्यामुळे या निधी संकलनाच्या निमित्ताने प्रत्येक प्रभागातील (१११) तीन ते चार इच्छूक उमेदवारींनी मतदारांशी संर्पक साधण्याच्या सूचना करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे निधी संकलनाच्या आडून भाजपाच्या प्रचाराला शुक्रवारपासून सुरुवात झाली असल्याचे दिसून येणार आहे.

स्वबळावर लढण्याची कार्यकर्त्यांची गळ

नवी मुंबई पालिकेसाठी मनसेबरोबर युती करून आपल्या पंधरा ते वीस कार्यकत्र्यांना नाराज करण्यापेक्षा पक्षाने स्वबळावर या क्षेत्रातील १११ प्रभागांची निवडणूक लढवावी असे बुधवारी झालेल्या कार्यकत्र्यांच्या बैठकीत व्यक्त करण्यात आले आहे. त्यामुळे भाजप सर्व जागा लढविणार असून एका प्रभागात तीन ते चार उमेदवार इच्छूक आहेत. त्यांची मुलाखत घेतल्या जाणार असून तीन आमदारांच्या शिक्कामोर्तबानंतर एक नाव राज्य निवडणूक निवड समितीकडे सोपविले जाणार आहे. बंडखोरी टाळण्यासाठी ही यादी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी जाहीर केली जाणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 15, 2021 12:29 am

Web Title: rammandir fund navi mumbai bjp campaign akp 94
Next Stories
1 सायबर गुन्ह्यांत तिप्पट वाढ
2 दहा थकबाकीदारांची बँक खाती गोठवली
3 अमूर ससाणाच्या छायाचित्रीकरणावर बंदी
Just Now!
X