ऐरोली येथे होणाऱ्या प्रचंड वाहतूक कोंडीच्या मनस्तापाचा आज उद्रेक झाला. एका युवकाचा अपघात त्याला कारणीभूत ठरला. तो युवक गंभीर जखमी झाल्यामुळे मुलुंड खाडी पुलानजीक सर्वपक्षीय रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. वाहतूक पोलिसांनी समजूत काढल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. त्यानंतर वाहतूक सुरू झाली.

मुंब्रा बाह्य़वळण मार्गाचे काम सुरू असल्याने ठाणे, मुलुंड आणि मुंबईकडे जाणारी सर्व वाहतूक नवी मुंबई, ऐरोलीमार्गे वळवण्यात आली आहे. यात मुंबई एमआयडीसी, अंधेरी सीप्झ, मुलुंड, नाहूरला जाणाऱ्या गाडय़ा ऐरोलीमार्गे जात असल्याने गेल्या अनेक महिन्यांपासून वाहतुकीचा पूर्ण बोजवारा उडाला आहे. या रस्त्यावरून जाणे म्हणजे नरकयातना भोगल्याप्रमाणेच असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.

ऐरोली सेक्टर १७ गणपती चौकात बुधवारी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास एका ट्रकने दुचाकीस्वारास धडक दिल्याने तो जखमी झाला. वाहतूक कोंडीवर शेकडो वाहनचालकांनी राग काढलाच, शिवाय ऐरोली परिसरात राहणाऱ्यांनाही त्यामुळे मनस्ताप सहन करावा लागत असल्याने त्यांनीही सहभाग घेतला. यात मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना या राजकीय पक्षांचे स्थानिक नेते मैदानात उतरल्याने प्रचंड गर्दी झाली. रास्ता रोकोही करण्यात आले. या गोंधळात ट्रकचालकाने पलायन केल्याने वाहतूक कोंडीत भर पडली. रबाळे पोलीस, वाहतूक पोलिसांनी कौशल्याने परिस्थिती हाताळल्यामुळे तसेच राजकीय नेत्यांनी सामंजस्याची भूमिका घेतल्याने काही वेळातच आंदोलन शमले.

वाहतूक पोलिसांचे मनुष्यबळ वाढवणे अतिशय गरजेचे आहे. आज दोन अपघात झाले. सुदैवाने दोन्ही अपघातांत कोणाचा जीव गेला नाही, मात्र एकाचे पाय फ्रॅक्चर झाले. मुंब्रा बाह्य़वळण सुरू होईपर्यंत तरी अन्य ठिकाणाचे मनुष्यबळ पुरवावे एवढीच आमची अपेक्षा आहे.

– अशोक पाटील, नगरसेवक