वातावरणात वाढलेल्या अचानक उष्णतेमुळे काही प्रमुख भाज्यांची आवक मंदावल्याने फरसबी, वाटाणा, शेवग्याच्या शेंगा, गवार या भाज्यांचे भाव कडाडले आहेत. कोबी, प्लॉवर, टोमॅटो या भाज्या मात्र तुलनेने स्वस्त आहेत.

परतीच्या पावसाने घेतलेली ओढ आणि वातारणात वाढलेला उष्णता यामुळे काही भाज्या महागल्या आहेत. यात गवार ४०ते ४५ प्रति किलो असून वाटाणा मात्र ९० ते १०० रुपये किलो घाऊक बाजारातच विकला जात आहे. त्यामुळे त्याचे किरकोळ बाजारातील दर शंभर रुपयांच्या वर गेले आहेत. याशिवाय शेवग्याच्या शेंगादेखील ४४ ते ५२ रुपये किलो आहेत. भेंडी ३० ते ३२ रुपये किलोने विकल्या जात आहेत. तुर्भे येथील घाऊक बाजारात सर्वसाधारणपणे साडेसहाशे गाडय़ा भाज्यांची आवक होते मात्र शुक्रवारी ही आवक १०० गाडय़ांनी कमी झाल्याने काही भाज्यांचे दर मात्र वाढले आहेत.