नेरुळमध्ये आगरी कोळी भवन तर ऐरोलीत सरस्वती विद्यालयात मतमोजणी

नवी मुंबईतील बेलापूर व ऐरोली या दोन्ही मतदारसंघात अतिशय शांततेत मतदानप्रक्रिया पार पडल्यानंतर आता २४ तारखेला होणाऱ्या मतमोजणीसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज असल्याची माहिती बेलापूर व ऐरोली मतदारसंघाचे निवडणूक अधिकऱ्यांनी दिली. गुरुवारी प्रत्यक्ष मतमोजणीला सकाळी ८ वाजता सुरुवात होणार असून काही तासातच निकाल स्पष्ट होईल असेही त्यांनी सांगितले.

बेलापूर मतदारसंघातून महायुतीच्या मंदा म्हात्रे, महाआघाडीचे अशोक गावडे,मनसेचे गजानन काळे यांच्यात लढत आहे. तरऐरोली मतदारसंघात महायुतीचे गणेश नाईक, महाआघाडीचे गणेश शिंदे तर मनसेचे निलेश बाणखेले यांच्यात मुलढत आहे. या सर्वाचे भवितव्य सोमवारी मतदानयंत्रात बंद झाले आहे.

बेलापूर मतदारसंघाची मतमोजणी नेरुळ येथील आगरी कोळी भवन येथील पहिल्या मजल्यावर होणार आहे. या मतदारसंघात ३९० मतदान केंद्र होती. मतदानानंतर सर्व यंत्र ठेवण्यासाठी या ठिकाणी पहिल्या मजल्यावर एका बंद खोलीत ठेवण्यात आली असून कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यात एसआरपी, सीपीएफ व पोलीस असा तिहेरी बंदोबस्त आहे.

ऐरोली मतदारसंघाची मतमोजणी सरस्वती विद्यालय ऐरोली सेक्टर ५ येथे मत्होणार असून ४४० मतदान केंद्र होती. याठिकणीही अशीच सुरक्षा टेवण्यात आली आहे. दोन्ही मतदारसंघात मतमोजणीसाठी १४ टेबल लावण्यात आले असून उमेदवारांचे प्रतिनिधी यांनी सकाळी ६ वाजताच मतमोजणी केंद्रावर उपस्थित राहायचे आहे. प्रत्यक्ष ८ वाजता टपाली मतपत्रिकांची मतमोजणीपासून मतमोजणीला सुरवात होणार आहे. तर ८.३० वा प्रत्यक्ष मतदानयंत्रातील मतमोजणीला सुरवात होणार आहे. बेलापूरमध्ये मतमोजणीच्या २८ फेऱ्या तर ऐरोली मतदारसंघात ३२ फेऱ्यांमध्ये मतमोजणी होणार आहे. प्रत्येकी २०० मतमोजणी कर्मचारी या कामासाठी सज्ज असल्याचे बेलापूर मतदारसंघाचे निवडणूक अधिकारी ज्ञानेश्वर खुटवड व ऐरोली मतदारसंघाचे निवडणूक अधिकारी अभय करगुटकर यांनी सांगितले.  नेरुळमध्ये झोटींगदेव मैदान येथे कार्यकर्त्यांना थांबता येणार असून ऐरोलीमध्येही मोकळ्या मैदानात थांबण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.

पनवेलमध्ये कडक सुरक्षा

पनवेल विधानसभा निवडणुकीत विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांना पडलेले ५४.१३ टक्के मतदान वि.खं. विद्यालयाच्या बंद खोलीत कडक बंदोबस्तात ठेवण्यात आले आहे. गुरुवारी मतमोजणी होणार असून पनवेलकरांनी कोणत्या पक्षाला व उमेदवाराला कौल दिला हे स्पष्ट होणार आहे.  मंगळवारी पहाटे तीन वाजता पनवेलच्या मुख्य निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी ही खोली सीलबंद केली. सध्या या सीलबंद खोलीच्या बंदोबस्तासाठी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या १० जवानांची सुरक्षा देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे ४० पोलिसांचाही बंदोबस्त आहे.

दोन्ही मतदारसंघात शांततेत मतदान पार पडले आहे. मतदानादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला नसून मतमोजणीच्यावेळीही कडेकोट बंदोबस्त ठेवला जाणार आहे. अनुचित प्रकार होणार नाही, यासाठी योग्य ती खबरदारी घेण्यात आली आहे. -पंकज डहाणे, पोलीस उपायुक्त, परिमंडल १