सिडको कचरा घोटाळाप्रकरणी शिवसेना, काँग्रेसची मागणी
माती मिसळून कचऱ्याचे वजन वाढवायचे आणि त्यामधून कोटय़वधी रुपयांची माया गोळा करण्याचे प्रकार करणाऱ्या सिडकोतील टोळीची सखोल चौकशी करून दोषी कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या वेतन व देयकांच्या रकमेतून या घोटाळ्याची रक्कम वसूल करावी, अशी लेखी मागणी शिवसेना व काँग्रेसने बुधवारी सिडको व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया यांच्याकडे केली. कंत्राटदार व सिडको अधिकाऱ्यांनी हातात हात घालून केलेल्या कचरा घोटाळ्याची लोकसत्ताने पोलखोल केल्यानंतर सामान्य नागरिक ते राजकीय प्रतिनिधी अशा सर्वानी लोकसत्ताकडे संतप्त प्रतिक्रिया नोंदवल्या. भाटिया यांनी दक्षता विभागातर्फे चौकशी न करता स्वतंत्र चौकशी समिती नेमून व त्यामध्ये रहिवाशांचा प्रतिनिधी घेऊनच या प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.
मागील दोन वर्षांपासून सिडको वसाहतीमधील कचरा घोटाळ्यांनी सामायिक पद्धतीने सिडकोच्या तिजोरी लुटली. या घोटाळ्याचे बिंग काही जागरूक रहिवासी व लोकसत्ताने फोडल्यानंतर स्वच्छ कारभाराचा दावा करणाऱ्या सिडको प्रशासनातील उच्चपदस्थांचा आवाज बंद झाला. काँग्रेसचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष सुदाम पाटील यांनी या घोटाळ्याची चौकशी करावी आणि दोषी सिडको अधिकाऱ्यांच्या वेतनातून घोटाळ्यातील रक्कम परत मिळवावी, अशी मागणी केली आहे. सिडकोने दहा दिवसांच्या आत या प्रकरणाची चौकशी न केल्यास आमचा पक्ष सिडकोविरोधात आंदोलनाचा पवित्रा घेईल, आघाडी सरकारच्या काळात सिडको अधिकाऱ्यांची घोटाळा करण्याची धमक झाली नाही, त्यामुळे युती सरकारच्या काळात वरिष्ठांच्या आशीर्वादाने हा घोटाळा झाल्याचे या निवेदनात म्हटले आहे.
कचऱ्याची वाहतूक करणाऱ्या भारत विकास ग्रुप (बीव्हीजी) कंपनीला सिडको कार्यक्षेत्रातून हद्दपार करण्याची मागणी शिवसेनेचे रायगड जिल्हा ग्राहक संरक्षण कक्षाचे जिल्हा उपकक्षप्रमुख आत्माराम कदम यांनी याविषयी केली आहे. कळंबोली वसाहतीतून १० टन कचरा गोळा होत असताना सिडको अधिकारी व बीव्हीजी कंपनीच्या व्यवस्थापकांच्या टोळीने तो ५० टन करण्याचा प्रताप केल्याने या कंपनीकडून घोटाळ्याची रक्कम वसूल करुन त्यांना हाकलून द्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. सिडकोचा हा सर्वात मोठा भ्रष्टाचार असून यामुळे व्यवस्थापकीय संचालक भाटिया यांच्या स्वच्छ प्रतिमेला तडा गेल्याचे शिवसेनेने म्हटले आहे.
कदम यांच्याप्रमाणे सिडको वसाहतीमधील निवृत्त शिक्षक एम. एस. ठाकूर यांनी लोकसत्ताकडे प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सिडकोने तीन वर्षांपूर्वी प्रत्येक गृहनिर्माण सोसायटीला प्लॅस्टिक कचरापेटी दिली आहे. एकूण कचऱ्याचे वजन कळण्यासाठी या कचरापेटय़ांचा उपयोग करून घेता येईल, असे त्यांनी म्हटले आहे.