03 June 2020

News Flash

रक्तचंदन तस्करांना गंडा घालणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

चोरी झालेल्या एका ट्रकचा तपास करताना कळंबोली पोलिसांनी त्या ट्रकमधील रक्तचंदनाच्या जीवावर गब्बर होऊ पाहाणाऱ्या तब्बल अकरा जणांच्या टोळीचा पर्दाफाश केला. यामध्ये नवी मुंबई पोलीस

चोरी झालेल्या एका ट्रकचा तपास करताना कळंबोली पोलिसांनी त्या ट्रकमधील रक्तचंदनाच्या जीवावर गब्बर होऊ पाहाणाऱ्या तब्बल अकरा जणांच्या टोळीचा पर्दाफाश केला. यामध्ये नवी मुंबई पोलीस दलातील एक पोलीस हवालदारही सामील होता. या हवालदाराला कोठडीत डांबल्यानंतर अनेक बडय़ा व्यापाऱ्यांची नावे समोर आली. या प्रकरणामुळे पोलीस व रक्तचंदन तस्कर यांच्यातील लागेबांधे उजेडात आले आहेत.
एप्रीलमध्ये कळंबोली स्टील बाजारातून एक रिकामा ट्रक चोरीला गेला होता. मोहम्मद जेहार याने याबाबत तक्रार दिली होती. पोलिसांनी शेजारच्या गोदामातील कामगारांची चौकशी केल्यानंतर अजब खुलासा झाला. या ट्रकमध्ये रक्तचंदन असल्याचे समजल्यानंतर हा तपास युद्धपातळीवर सुरू झाला. पोलिसांनी जेहारची चौकशी केल्यावर या प्रकरणात कळंबोली येथे राहणारा अनंत शेलार हा सहभागी असल्याचे सांगण्यात आले. शेलारच्या चौकशीनंतर चोरावर मोर होऊ पहाणाऱ्या अनेकांच्या चेहऱ्यावरील मुखवटे दूर झाले.
तामिळनाडू येथील प्रभाकरन याने जेएनपीटीतून परदेशात रक्तचंदन पाठविण्यासाठी अंबर मुफ्ती व जेहारची मदत घेतली होती. त्यांनी कळंबोली गोदामामधील एका ट्रकमध्ये हे रक्तचंदन ठेवण्याचे ठरवले होते. त्यासाठी त्यांनी नवी पोलीस दलातील संजय नांदगावकर तसेच शीतलकुमार जैन यांची मदत घेतली. त्यानुसार शेलार, नांदगावकर, जैन यांनी रक्तचंदनाने भरलेला ट्रक कळंबोली स्टील बाजारालगत उभा केला.
गोदामात जागा मिळेपर्यंत तो ट्रक तेथेच राहणार होता. कोणालाही संशय येऊ नये, यासाठी आठ टन लाकडे ट्रकमध्ये भरण्यात आली होती. मात्र रात्री हा ट्रक परस्पर लंपास करण्याचा विचार शेलार, नांदगावकर व जैन यांनी केला. मात्र, शेलारने त्यांनाही गंडा घालून हे रक्तचंदन परस्पर विकण्याचे ठरवले. यासाठी शेलारने कळंबोली येथील हरदीपसिंग, संदीप शिर्के (नेरूळ) व मकरंद घागरे (कोपरखैरणे) यांची मदत घेतली आणि तो ट्रक पळविला. दुसऱ्या दिवशी मुफ्ती व जेहारला ट्रक सापडला नाही. काही दिवसांनी प्रभाकरनच्या दबावामुळे त्याने पोलिसांकडे तक्रार केली. नांदगावकर हा पोलीस हवालदार असल्याने या प्रकरणात पोलीस मदत करतील, अशी भावना जेहारची होती.
ाांदगावकर हा पोलीस आयुक्तालयात बडय़ा अधिकाऱ्यांच्या मर्जीतला पोलीस असल्याने आपल्याला अटक होईल, असे त्याला वाटत नव्हते. मात्र तत्कालीन अतिरिक्त पोलीस आयुक्त फत्तेसिंह पाटील यांच्या बदलीनंतर कळंबोली पोलिसांनी नांदगावकरला अटक केली. सर्व संशयित आरोपींना अटक होऊनही चोरीचा माल पोलिसांना सापडत नव्हता. यासाठी मुंबईमधील दादरच्या साटम बंधूंच्या चौकशीपर्यंत येऊन तपास थांबला होता. साटम बंधूंनी उच्च न्यायालयात जामिनासाठी धाव घेतली. पोलिसांना सहकार्य करण्याच्या अटीवरून साटम बंधूंना अटकपूर्व जामीन मिळाला. पोलिसांनी सुजित साटम याच्याकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे सात टन रक्तचंदन पोलिसांसमोर हजर करण्यात आले.
या प्रकरणात सात जणांना जामीन मिळाला आहे, दोघांनी अटकपूर्व जामीन मिळवला आहे, तर दोघे फरार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 8, 2015 7:20 am

Web Title: red wood robbery in navi mumbai
टॅग Robbery
Next Stories
1 नवरात्रोत्सवाच्या खरेदीला उधाण
2 दिघ्यातील रोष मावळला
3 सात रुपयांत रेल्वे स्थानक गाठा!
Just Now!
X