१२० वाहने उभी करणे शक्य, दिवसाला ८८ वाहनांची चाचणी

प्रादेशिक परिवहन विभागाच्या नेरुळ सेक्टर १९ ए येथील वाहन तपासणी केंद्राच्या आवारातील वाहन पार्किंगच्या क्षमतेची बुधवारी आरटीओ अधिकाऱ्यांनी चाचपणी केली. केंद्राच्या आवारात १२० वाहने पार्क करणे शक्य आहे. दिवसाकाठी केवळ ८८ वाहनांची तपासणी केली जाणार असल्यामुळे त्यांच्यासाठी पुरेशी जागा असल्याचे पाहणीतून दिसून आले आहे.

पार्किंग सुविधेची चाचपणी करण्यासाठी काही वाहने बुधवारी नेरुळमधील या भूखंडावर आणण्यात आली होती. वाहने उरण फाटा येथून आम्रमार्गाने पारसिक हिलच्या पायथ्याशी असलेल्या सिग्नलजवळून वंडर्स पार्कपर्यंत जाणार आहेत. तेथून डावीकडे वंडर्सपार्कच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरून वाहने चाचणी मार्गिकेवर जाणार आहेत.

तपासणी झाल्यानंतर ही अवजड वाहने पुन्हा त्याच रस्त्याने उरण फाटय़ाकडे जाणार आहेत. परंतु वंडर्स पार्क समोरच्याच रस्त्यावरून वाहनांची ये-जा सुरू राहणार आहे. त्यामुळे हा भूखंड चाचणी मार्गिकेसाठी देण्यास रहिवाशांनी विरोध दर्शवला होता, केंद्र सुरू करण्याविरोधात  याचिकाही करण्यात आली होती.

नेरुळ येथील वाहन तपासणी केंद्रातील पार्किंगची व्यवस्था तपासली. तिथे सुमारे १२० गाडय़ा पार्क करता येणार आहेत. दिवसाला केवळ ८८ वाहनांचीच तपासणी करण्यात येणार आहे. अद्याप भूखंडाभोवतीची लोखंडी जाळी, मुख्य प्रवेशद्वार इत्यादी कामे शिल्लक आहेत. ती झाल्यानंतर उद्घाटन करण्यात येणार आहे.

संजय डोळे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी