पाच महिन्यांत टप्प्याटप्प्याने वाटप करण्याचे नियोजन

नवी मुंबई : गेले सहा महिने घरांचा हप्ता व घरभाडे आशा दुहेरी आर्थिक पेचात अडकलेल्या सिडकोच्या लाभाथ्र्यांना दिलासा देणारी बातमी आहे. मेपासून सप्टेंबरपर्यंत पाच महिन्यांत घरांचा ताबा देण्याचे नियोजन सिडकोने केले आहे.

सिडकोने दोन वर्षांपूर्वी २४ हजार घरांची सोडत काढली होती. त्यातील कागदपत्रे पूर्ण असलेल्या लाभाथ्र्यांना घरांचा ताबा हा ऑक्टोबर २०२० मध्ये दिला जाणार होता. करोनामुळे यात वारंवार मुदतवाढ देण्यात आली. त्यानंतर मार्च २०२१ पर्यंत ताबा देण्याचे सिडकोने आश्वासन दिले होते. मात्र तेही पाळले नाही. त्यामुळे सिडको लाभाथ्र्यांत तीव्र संताप आहे.

सिडकोने मागील चार वर्षांत दोन लाख घरे बांधण्याचे लक्ष ठेवले आहे. केंद्र सरकारच्या सर्वांसाठी घर या योजनेअंर्तगत सिडकोने महागृहनिर्मिती हाती घेतली आहे. माजी व्यवस्थापैकीय संचालक संजय भाटिया यांनी ५३ हजार घरांचा आराखडा तयार केला होता. त्यानंतर आलेले लोकेश चंद्र यांनी थेट दोन लाख घरे बांधण्याची घोषणा केली होती. मात्र सिडकोकडील आर्थिक तुटवडा आणि जागेचा अभाव यामुळे विद्यमान व्यवस्थापैकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांनी या घरांची संख्या कमी करुन ती ६५ हजारापर्यंत ठेवली आहे. यातील २४ हजार घरांची सोडत सिडकोने दोन वर्षांपूर्वीपासून काढलेली आहे. एकदा १४ हजार ७३८ आणि नंतर ९ हजार २४८ घरांच्या सोडती काढण्यात आल्या होत्या. अल्प उत्पन्न गट, पंतप्रधान आवास योजना, अल्प गटातील या घरांचे बांधकाम सुरू करण्यात आले असून यातील अर्धी अधिक घरे बांधून तयार असून ताबा देण्याच्या स्थितीत आहेत. मात्र अनेक घरांची अर्तंगत कामे, सजावट शिल्लक आहे. गेल्या वर्षी मार्च महिन्यांत सुरू झालेल्या करोना साथरोगामुळे अनेक कामगार गावी गेले होते. सिडको बांधकामावर काम करणाऱ्या कामगार मजुर यांना रोखण्यात कंत्राटदार यशस्वी झाले होते पण सप्टेंबरपर्यंत बांधकामालाच परवानगी नसल्याने ही काम स्थागित झाली होती. त्यामुळे स्थापत्य दृष्टीने तयार असलेली कामे केवळ अंर्तगत कामामुळे रखडलेली होती. सिडकोने यातील चार हजार घरांचा ताबा ऑक्टोबर २०२० पर्यंत देण्याचे आश्वाासन दिले होते. करोनामुळे ही मुदत नंतर मार्चअखेरपर्यंत देण्यात आली होती, पण ती मुदतदेखील आता संपली असून मेपर्यंत या घरांचा ताबा दिला जाईल असे आश्वासन सिडकोच्या वतीने दिले जात आहे. मार्च २०२१ मध्ये ताबा देण्यात येणारी घरे सप्टेंबर अर्थात पावसाळा संपल्यानंतर दिले जातील असे नियोजन केले जात आहे. त्यामुळे मे ते सप्टेंबर या पाच महिन्यांत रखडलेल्या सर्व घरांचा ताबा सिडको देणार असल्याचे समजते.

लाभार्थ्यांना संताप

सिडकोने करोनाकाळातही लाभाथ्र्यांकडून हप्ते वसूल करीत प्रक्रिया पूर्ण केली आहे. त्यामुळे २०१८ मधील अनेक लाभार्थी सध्या सिडकोच्या घरांचे हप्ते कर्ज काढून भरलेले आहेत. एकीकडे हा घरांचा हप्ता सुरू झाला आहे तर राहत असलेल्या घराचे घरभाडेही द्यावे लागत आहे. त्यामुळे मोठा आर्थिक पेच निर्माण झाला आहे. या परिस्थितीतही सिडकोकडून घरांचा ताबा कधी देणार याबाबत ठोस उत्तर दिले जात नाही. वारंवार मुदतवाढ दिली जात आहे. यामुळे हे लाभार्थी तीव्र नाराजी व्यक्त करीत आहे.

सिडकोच्या घरांचे काम प्रगतिपथावर आहे. ग्राहकांना नियोजित वेळेत ताबा करोनासाथीमुळे देता आलेला नाही. मात्र गेल्या वर्षी दिल्या जाणाऱ्या व या वर्षीच्या घरांचा ताबा याच वर्षी सप्टेंबरपर्यंत टप्प्याटप्प्याने देण्याचा सिडकोचा प्रयत्न आहे. दोन महिन्यांत पहिल्या टप्प्यातील ग्राहकांना घरे दिली जातील. – डॉ. संजय मुखर्जी, व्यवस्थापैकीय संचालक, सिडको