सिडकोच्या पुनर्विकास अटीची अंमलबजावणीच नाही; दरम्यानच्या काळात अनेक घरांची विक्री

नवी मुंबईतील जेएन-१ जेएन-२ च्या इमारतींच्या पुनर्विकासाची परवानगी देताना म्हणजेच एप्रिल २०१७मध्ये हस्तांतरबंदीचा निर्णय घेण्यात आला असला, तरी हस्तांतरणबंदीची प्रत्यक्ष अंमलबजावणी मात्र १ ऑगस्ट २०१८पासून सुरू करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे मधल्या दीड वर्षांच्या काळात या नियमाची अंमलबजावणी का करण्यात आली नाही, असा प्रश्न रहिवाशांना पडला आहे.

वाशीतील जेएन-१, जेएन-२ प्रकारच्या सुमारे १० सोसायटय़ांना सिडकोने पुनर्विकासाची परवानगी दिली आहे. वाशी सेक्टर ९ ,१० मधील तसेच सेक्टर १६ मधील सी टाइपमधील १ ते १० क्रमांकाच्या धोकादायक इमारतींमधील घरांचे हस्तांतरण करता येणार नसल्याचा निर्णय २०१७ ला घेण्यात आला, मात्र त्याची अंमलबजावणी १ ऑगस्टपासून सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे वाशीतील या सोसायटय़ांतील रहिवाशांना आता आपली घरे विकता येणार नाहीत.

वाशी हे अत्यंत महत्त्वाचे उपनगर आहे. येथील घरांचे भाव गगनाला भिडले आहेत. जेएन-१, जेएन-२मधील घरांचे भाव पुनर्विकासानंतर कोटय़वधींत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेक बांधकाम व्यावसायिकांचे लक्ष या घरांकडे लागले आहे. आता घर हस्तांतरित होणार नसल्याने बांधकाम व्यावसायिकांची माणसे गरजवंतांना हेरून त्यांच्याकडून कमी किमतीत घरे खरेदी करण्यासाठी सरसावली आहेत. घरांची नोंदणी करून आणि मुद्रांक शुल्कही भरून संबंधित सभासदांकडून ‘पॉवर ऑफ अ‍ॅटर्नी’ करून घेतले जाण्याची चिन्हे आहेत.

अशा प्रकारे घरे विकण्याचा प्रकार काही महिन्यांत तेजीत येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यात फसवणूकही होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. हस्तांतरण झाल्याशिवाय या घरांसाठी कर्जही मिळत नाहीत, त्यामुळे रोख व्यवहार करणाऱ्यांचे फावणार असून यात विकासक आघाडीवर असल्याचे बोलले जाते.

आमचे घर आमच्या मालकीचे असताना सिडकोने घेतलेला हस्तांतरण थांबवण्याचा निर्णय चुकीचा आहे, सिडकोला दीड वर्षांनंतर आताच अंमलबजावणी करण्याची उपरती का सुचली, असा प्रश्न रहिवासी करत आहेत. सिडकोने निर्णयाची अंमलबजावणी न केल्याच्या काळात म्हणजे गेल्या दीड वर्षांत हस्तांतरित झालेल्या घरांबाबत सिडको काय निर्णय घेणार, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. यामध्ये नागरिकांचा फायदा होणार आहे.

सिडको अपार्टमेंट ओनरशिप नियमांचे उल्लंघन करत आहे. घर माझे आहे. विकणारा व घर घेणारा तयार असेल तर सिडकोचा आक्षेप का आहे, अशी टीका श्रद्धा अपार्टमेंटमधील रहिवासी भगवान पाटील यांनी केली.

सिडकोने वाशीतील जेएन-१, जेएन-२ मधील धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाठी ना- हरकत प्रमाणपत्र देतानाच येथील घरांचे हस्तांतर करता येणार नसल्याची अट घालण्यात आली होती. त्यानंतरही सिडकोच्या साहाय्यक वसाहत अधिकाऱ्यांकडून घरांचे हस्तांतरण करण्यात आले असेल तर याबाबत योग्य ती चौकशी करण्यात येईल. कारण नियम झाल्यापासूनच घरांच्या हस्तांतरणावर बंदी घालण्यात आली आहे.

– फैयाज खान, व्यवस्थापक, शहरसेवा, सिडको

वाशीतील पुनर्विकासातील घरांचे हस्तांतरण करता येणार नसल्याचा निर्णय सिडकोने २०१७ मध्ये घेतला. परंतु त्याबाबतचे परिपत्रक ३ ऑगस्टला प्राप्त झाल्यामुळे आतापर्यंत घरे हस्तांतरित करण्यात येत होती.

– आनंद देशमुख, साहाय्यक वसाहत अधिकारी, सिडको, वाशी