नवी मुंबई पालिकेचे व्यवस्थापनाला तोंडी आदेश

नवी मुंबई : मुंबईतील ६० टक्के करोना रुग्ण नवी मुंबईतील ‘सुपर स्पेशालिटी’ रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. त्यामुळे  नवी मुंबईतील बाधितांना प्रवेश नाकारला जात आहे. रुग्णांची ही गैरसोय टाळण्यासाठी नवी मुंबई पालिकेच्या आरोग्य विभागाकडून प्रयत्न केले जाणार आहेत. नवी मुंबईतील रुग्णांना खासगी रुग्णालयात खाटा आरक्षित ठेवण्याचे तोंडी आदेश आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी खासगी रुग्णालयांना दिले आहेत.

नवी मुंबईत खासगी रुग्णालयांची संख्या जास्त आहे. मुंबईत रुग्णांची संख्या वाढत आहेत. त्यामुळे खासगी रुग्णालय परवडणारे रुग्ण नवी मुबंईतील खासगी रुग्णालयात धाव घेत आहेत. त्यामुळे नवी मुंबईत ६० टक्के रुग्ण हे मुंबईतील असल्याचे स्पष्ट झाले आहे.

खासगी रुग्णालयांत खाटा शिल्लक नसल्याने नवी मुंबईतील करोना रुग्णांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. पालिकेच्या उच्च अधिकाऱ्यांनी शिफारस केलेल्या रुग्णांनाही खासगी रुग्णालयात प्रवेश मिळणे अवघड झाले आहे.

त्यामुळे नवी मुंबईतील रुग्णांना प्राधान्याने प्रवेश मिळावा यासाठी खासगी रुग्णालयातील काही खाटा राखीव ठेवण्याचे तोंडी आदेश पालिकेच्या आरोग्य विभागाने दिले आहेत. खासगी रुग्णालयांनी या आदेशाची अंमलबजावणी न केल्यास त्यांच्या रुग्णालयातील जास्तीत जास्त खाटा करोना रुग्णांसाठी आरक्षित केल्या जातील, अशा सूचना या खासगी रुग्णालयाच्या व्यवस्थापनाला एका अधिकाऱ्याने दिल्या आहेत.

नवी मुंबईत करोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून खासगी रुग्णालयेदेखील अपुरी पडत आहेत. पालिकेने अत्यावस्थ रुग्णांसाठी खासगी रुग्णालयात एक हजारापर्यंत खाटा आरक्षित ठेवलेल्या आहेत. परंतु, त्यातील अनेक खाटा मुंबईकर करोना रुग्णांनी व्यापलेल्या आहेत.

अडीचशे खाटांची सोय

नवी मुंबईकर करोना रुग्णांसाठी पालिका वाशी येथील कोविड काळजी केंद्रात २०० खाटांचे विशेष कोविड रुग्णालय उभारणार आहे. सानपाडा येथील एमजीएमच्या नियोजित रुग्णालयात करोना रुग्णांची व्यवस्था करण्यात येणार आहे. याशिवाय नेरुळ येथील डी. वाय. पाटील रुग्णालयात अत्यवस्थ रुग्णांसाठी ५० खाटा तयार ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्याची देयके पालिकेच्या वतीने दिली जाणार आहेत.