वर्षभरात अवघा १८० किलो कचरा गोळा

(पूनम धनावडे ) नवी मुंबई नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील रहिवासी ई-कचरा संकलनाबाबत मात्र उदासीन असल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या वर्षभरात पालिका क्षेत्रातील ई-कचऱ्यासाठीच्या कुंडय़ांत केवळ १८० किलो कचरा संकलित झाला आहे.

जून २०१७ मध्ये नेरुळ, बेलापूर, वाशीमध्ये लाल कचराकुंडय़ा बसविण्यात आल्या. त्यानंतर शहरातल्या जास्तीत जास्त वर्दळीच्या ठिकाणांचे सर्वेक्षण करून तिथेही अशाच कचराकुंडय़ा ठेवण्यात येणार होत्या. मात्र या योजनेसाठी सहभागी होणाऱ्या खासगी कंपन्यांनी योग्य प्रतिसाद न दिल्याने अद्याप इतर ठिकाणी लाल कचराकुंडय़ा बसविण्यात आलेल्या नाहीत, असे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी

सांगितले. ई-कचरा व्यवस्थापनाची माहिती अद्याप नागरिकांमध्ये पोहचलेली नाही, पुरेशी जनजागृती नाही. त्यामुळे संकलनास पुरेसा प्रतिसाद मिळत नाही, असेही त्यांनी सांगितले.

नेरुळ-वंडर्स पार्क येथील भागात बऱ्यापैकी ई-कचरा जमा झाला आहे. यामध्ये सीडी, कीबोर्ड यांचा अधिक समावेश आहे. परंतु वाशी इनऑरबिट मॉल, बेलापूर पालिका मुख्यालय विभागात कमी ई-कचरा जमा झाला आहे. ई-कचरा

संकलनाविषयी जनजागृती करण्यासाठी पालिका काही संस्थांची मदत घेणार आहे. स्त्री मुक्ती संघटनेसारख्या अन्य संस्थांशी संलग्न होऊन जनजागृती करण्यात येणार आहे. या संस्थांच्या मदतीने अभियांत्रिकी, वैद्यकीय महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांमध्येही ई कचऱ्याविषयी जनजागृती करण्यात येणार आहे.

ई-कचरा म्हणजे..

सर्व निरुपयोगी इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा समावेश ई-कचऱ्यात होतो. उदाहरणार्थ संगणकाचे विविध सुटे भाग, बंद पडलेला मोबाईल, टीव्ही संच, जुन्या वाहनांचे सुटे भाग, मोबाईल चार्जर, सीडी इत्यादी. या कचऱ्यातील काही भागाचा पुनर्वापर करता येतो. या कचऱ्याचे नैसर्गिकरीत्या विघटन होण्यास बराच मोठा कालावधी लागतो त्यामुळे विघटनातही अडथळे निर्माण होतात.

संकलन

ठिकाण  जमा ई-कचरा

नेरुळ   १०० किलो

वाशी   ४०किलो

बेलापूर  ४० किलो

ई-कचऱ्याविषयी जनजागृती करणे गरजेचे आहे. लवकरच काही संघटना, संस्था यांच्या मदतीने जनजागृती करण्यात येणार आहे. तसेच ई-कचरा व्यवस्थापनात सहभागी कंपन्यांचा प्रतिसाद कमी होता, परंतु आता काही कंपन्या सहभागी होण्यास तयार झाल्या आहेत.

-तुषार पवार, उपायुक्त, घनकचरा व्यवस्थापन, नमुंमपा