हवेची गुणवत्ता मोजणाऱ्या यंत्रणेचा अभाव

मुंबई : खारघर, तळोजा आणि पनवेल परिसरांतील हवेमधील प्रदूषक घटकांची वाढ झाली आहे. वातावरण या संस्थेने केलेल्या मोजणीमधून ही बाब समोर आली आहे.

खारघर, तळोजा आणि पनवेल परिसरांत वातावरण संस्थेने १३ नोव्हेंबर ते १३ डिसेंबर या कालावधीत हवेची गुणवत्ता मोजणारी यंत्रणा पाच ठिकाणी कार्यरत केली. त्यातील नोंदीनुसार सकाळी सहा ते आठ या वेळेत ‘पीएम २.५’ या प्रदूषक घटकाची पातळी ही निर्धारित क्षमतेपेक्षा अधिक असल्याचे दिसून आले.

हवेच्या गुणवत्ता निर्देशांकानुसार ‘पीएम २.५’ या घटकाचे प्रमाण सरासरी ५० ते १०० (मायक्रो घनमीटर) इतके असेल तर ते समाधानकारक मानले जाते, तर १०० ते २०० हे प्रमाण मध्यम पातळी ठरते. खारघर, तळोजा आणि पनवेल या तिन्ही ठिकाणी ‘पीएम २.५’ हे प्रमाण १०० ते २०० दरम्यान नोंदविण्यात आल्याचे वातावरण संस्थेच्या आकडेवारीवरून दिसून येते. तळोजा औद्योगिक क्षेत्रामध्ये ‘पीएम २.५’ची पातळी सर्वाधिक म्हणजे १९७.१ नोंदविण्यात आली.

‘हा उपक्रम केवळ हवेची गुणवत्ता मर्यादित काळात तपासणे हा नसून या परिसरात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि स्थानिक स्वराज्य संस्थांकडे सातत्याने अशी गुणवत्ता तपासण्याची यंत्रणा नसणे हे अधोरेखित करणे महत्त्वाचे आहे,’ असे वातावरण संस्थेचे भगवान केसभट यांनी सांगितले. अशी यंत्रणा या ठिकाणी त्वरित कार्यरत करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. या नोंदींचा विस्तृत अहवाल संबंधित यंत्रणांना सादर करणार येईल, असे त्यांनी सांगितले.