महापालिकेत एकमताने प्रस्ताव मंजूर; प्रभाग स्तरावर जनमत आजमावणार

एकेकाळी मोठय़ा संख्येने डान्स बार असलेल्या पनवेलची वाटचाल दारूबंदीच्या दिशेने सुरू झाली आहे. पालिका क्षेत्रात पूर्ण दारूबंदी लागू करण्याचा ठराव सोमवारी पनवेल महापालिकेच्या सभागृहात मांडण्यात आला आणि सदस्यांनी तो एकजुटीने मंजूर केला. हा प्रस्ताव आता रायगड जिल्हाधिकारी कार्यालयात पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर उत्पादनशुल्क विभागाने प्रभाग स्तरावर ‘बाटली आडवी’ करण्यासंदर्भात मतदान घेतल्यानंतर दारूबंदी लागू होईल.

An advertisement board fell down in Wagholi due to strong winds Pune news
सोसाट्याचा वाऱ्यामुळे वाघोलीत कोसळला जाहिरात फलक
power supply of Kalyan East was suddenly interrupted in early morning
उकाड्याच्या होरपळीत कल्याणमध्ये विजेचा लपंडाव, उकाड्याने नागरिक हैराण
Sakkardara flyover, Nagpur,
नागपूर : भरधाव वाहनांसह अपघाताच्या भीतीचे सावट, सक्करदरा उड्डाण पुलावर मागील वर्षात १३ अपघात
Dhokli village, Illegal building Dhokli village,
कल्याणमध्ये ढोकळी गावात शाळेच्या आरक्षणावरील बेकायदा इमारत जमीनदोस्त, आय प्रभागाची कारवाई

सोमवारच्या बैठकीत शेकापचे सदस्य अरविंद म्हात्रे यांनी दारूबंदीच्या विषयाकडे सभागृहाचे लक्ष वेधले. सत्ताधाऱ्यांना दारूबंदी लागू करायची नव्हती, तर प्रस्ताव का मांडला असा प्रश्न त्यांनी केला. सभागृह नेते परेश ठाकूर व जगदीश गायकवाड यावर बोलण्यास उभे राहिले. विरोधी गटनेते प्रीतम म्हात्रे यांच्यावर तुमच्या नेत्यांना विचारलेय का, तुम्ही दारू पिता अशा प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली. त्यामुळे विरोधकांनी गदारोळ केला. दारूबंदी झालीच पाहिजे, अशा घोषणा विरोधकांनी दिल्या.

भाजपचे सदस्य संतोष शेट्टी यांच्याकडे दारूबंदीवर निवेदन करण्याची मागणी करण्यात आली. अखेर महापौर डॉ. कविता चौतमोल यांनी गदारोळ कमी केल्यास दारूबंदी होईल, अशी टिप्पणी केली. दारूबंदीचा निर्णय प्रभागस्तरावर होईल, मात्र प्रभाग समित्याच स्थापन न झाल्याकडे त्यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. विरोधी गटांकडून अरविंद म्हात्रे यांनी प्रभाग समितीचा कोणताही हस्तक्षेप दारूबंदीमध्ये नसल्याचा दावा केला. विरोधकांचा गदारोळ थांबवण्यात सत्ताधारी अपयशी ठरले.

दोन्ही बाकांवरील सदस्यांत आरोप- प्रत्यारोप सुरू असताना आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी त्या गदारोळातच सभागृहाला प्रभाग समित्यांच्या स्तरावर असा निर्णय घेता येईल, त्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे प्रस्ताव पाठविण्याचे अधिकार महासभेला आहेत, असे सांगितले. त्यानंतर सभागृह नेते परेश ठाकूर यांनी पनवेल शहर महानगरपालिका क्षेत्रात दारूबंदीचा ठराव मांडला. या ठरावाला जगदीश गायकवाड यांनी अनुमोदन दिले. सभागृहामध्ये उपस्थित सर्व राजकीय पक्षांच्या सदस्यांनी हात उंचावून समर्थन दिल्यावर ठराव बहुमताने मंजूर झाला.

असंसदीय भाषा

नेहमीप्रमाणे यावेळी सभागृहात असंसदीय वक्तव्ये झाली. तुम्ही दारू पिता, कोणासोबत पिता असे वैयक्तिक आरोप करण्यात आले. विरोधकांतील प्रीतम म्हात्रे यांनी आपण आजवर मद्यपान केले नसल्याचे सांगितले. अरविंद म्हात्रे यांनी रायगडची भूमी शिवाजी राजांची भूमी आहे. पनवेल हे रायगडचे प्रवेशद्वार आहे. तिथेच दारूबंदी करावी अशी मागणी केली. त्यावर आधी शेकापची सत्ता असलेल्या रायगड जिल्हा परिषदेत दारूबंदी करा, असे आव्हान भाजपचे स्वीकृत सदस्य नितीन पाटील यांनी दिले. आमच्या नेत्यांचे नाव का घेतले, असा प्रश्न विचारत स्वीकृत सदस्य प्रमोद भगत यांच्यासह शेकापच्या सदस्यांनी गदारोळ केला.

२४४ दुकानांवर टांगती तलवार

पनवेल दारूमुक्त झाल्यास २४४ दारूची दुकाने व परमिट रूमवर गदा येण्याची शक्यता आहे. त्यामुळे दारूविक्री करणाऱ्या व्यावसायिकांत भीतीचे वातावरण आहे. पनवेलमध्ये १८ दारूची दूकाने, १०३ परमिट रूम, १८ देशीदारूचे बार, १०४ बीअर शॉपी आहेत. सर्वात जास्त बीअरशॉपी कामोठे येथे आहेत. दुधाच्या केंद्रांपेक्षा या वसाहतीत बीअरची दुकाने आहेत. येथील महिला रस्त्यावरील मद्यपींच्या उपद्रवाने त्रस्त आहेत. दारूबंदी झाल्यास राज्य सरकारला महिन्याला सुमारे १८ कोटी रुपयांच्या व वर्षांला २१६ कोटी रुपयांच्या महसुलावर पाणी सोडावे लागणार आहे.