नवी मुंबई, पनवेल महापालिका आयुक्तांचे आवाहन

नवी मुंबई : नवी मुंबई पालिका आयुक्तांनी मंगळवारी शहरातील दुकाने, मॉल्स आणि इतर गर्दीच्या ठिकाणी नियम तोडणाऱ्या नागरिकांना दंड आकारण्याचे आदेश जारी केले आहेत. जगण्याचे स्वतंत्र हा लोकशाहीतील सर्वात चांगला अधिकार असून नवी मुंबईकरांनी जबाबदारीने वागावे की बेजबाबदार हे त्यांनी ठरवावे. नियम, दंड, आकारणे प्रशासनाला योग्य वाटत नाही, पण कडक निर्बंध शिथिल केल्याने नागरिकांनी त्याचा गैरफायदा घेऊ नये, असे आवाहन पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी केले आहे.

नवी मुंबई पालिका क्षेत्र हे दुसऱ्या स्तरात असल्याने सर्व व्यवहार सुरळीत सुरू झाले आहेत. करोना रुग्णांची संख्या दोन अंकांत गेली काही दिवस असल्याने सर्वानी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. पालिकेचे अनेक कोविड काळजी केंद्र बंद करण्याची वेळ आली आहे, पण पालिकेने तिसऱ्या लाटेची तयारी सुरू केल्याने काही रुग्णालयांतील वैद्यकीय यंत्रणा सुधारित केल्या जात आहे.

ऐरोली व नेरुळ येथील पालिकेची रुग्णालये अत्यवस्थ रुग्णांसाठी तयार केली जात आहेत. राज्य सरकारने निर्बंध शिथिल केल्यापासून गेली दोन दिवस नागरिक खरेदीसाठी मोठय़ा प्रमाणात बाहेर पडले असून, एपीएमसीत खरेदीसाठी झुंबड उडाल्याचे चित्र आहे. दोन दिवस पाऊस पडत असल्याने वातावरण अल्हाददायक आहे. त्याचा आनंद घेण्यासाठी नागरिक विनाकारण किंवा काहीतरी तकलादू कारण देऊन बाहेर पडले आहेत.

ही गर्दी अनेक ठिकाणी लक्ष वेधून घेत असून काही नागरिकांना नियमांचे भानदेखील नाही. दोन महिन्यांनंतर मोकळा श्वास घेण्यास मिळाला असल्याने पन्नास टक्के क्षमतेने खुली असलेल्या माल्समध्येदेखील प्रतीक्षा यादी वाढली आहे. तर काही जणांनी पबमध्ये संध्याकाळी रात्र जागवण्यास सुरुवात केली आहे. नवी मुंबई पालिकेचे आरोग्य बैठकीत या दोन दिवसांत उसळलेल्या गर्दीची चर्चा झाली. त्यावेळी तिसऱ्या लाटेची शक्यता अधिक व्यक्त करण्यात आली असून चौथ्या लाटेलादेखील प्रशासनाने तयार राहावे लागेल अशी शक्यता पालिका आयुक्त बांगर यांनी व्यक्त केली आहे.

राज्य सरकार व स्थानिक पालिकेने दिलेल्या मुक्त संचाराचा गैरफायदा नागरिक घेणार असतील तर ते बेजबाबदार वागणे अंगलट येण्याची शक्यता बांगर यांनी केली आहे. पालिकेच्या वतीने समाजमाध्यमांवर या बेजबाबदारीची जाहिरात केली जात असून नागरिकांना ती पोहचले अशी व्यवस्था पालिकेच्या आयटी विभागाने केली आहे. त्यामुळे बाजारात करोना तुमची वाट पाहात आहे अशा आशयाच्या जाहिरतीबरोबरच जबाबदारी की बेजबाबदारी याचा निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य नागरिकांना देण्यात आले आहे. अनेक नागरिक बाहेर फिरताना आरोग्य अंतराची तर पर्वाच करीत नाही, पण सुरक्षतेचे प्रमुख साधन असलेली मुखपट्टी ही हनुवटीच्या खाली आणून बोलत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे विनामुखपट्टी फिरणाऱ्यांचे प्रमाणही लक्षवेधी आहे. त्यामुळे पालिकेने आता ही जबाबदारी नागरिकांवर सोडली आहे.