पूनम सकपाळ

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजी व फळ बाजारात ग्राहक कमी झाले असताना धान्य बाजारात मात्र खरेदीसाठी गर्दी होत आहे. यात किरकोळ खरेदी करणाऱ्या ग्राहकांत २० टक्के वाढ झाल्याचे येथील व्यापाऱ्यांनी सांगितले. करोना रुग्णवाढीमुळे टाळेबंदीची भीती आहेच, शिवाय धान्ये, डाळी व तेलाच्या किमती किरकोळ बाजारात वाढल्याने घाऊक बाजारात खरेदीसाठी येत असल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे.

‘एपीएमसी’त जीवनावश्यक वस्तूंची खरेदी-विक्री होत असते. मात्र गेल्या वर्षी ‘एपीएमसी’तून करोना संसर्ग नवी मुंबईत जास्त पसरल्याचे दिसून आले होते. त्यामुळे पालिका प्रशासनाने ‘एपीएमसी’वर लक्ष केंद्रित केले असून करोना रुग्ण वाढले तर काही निर्बंध येण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षीही येथील आवक कमी झाली होती. त्यामुळे करोना टाळेबंदीच्या भीतीने धान्य बाजारात ग्राहक वाढले आहेत. यात किरकोळ ग्राहकांची संख्या जास्त आहे.

व्यापाऱ्यांनी गर्दी न करण्याचे आवाहन केले आहे. पुढील महिनाभर पुरेल इतका धान्यसाठी उपलब्ध असल्याचे सांगितले आहे. मुंबई व उपनगरे मिळून १ कोटी २७ लाखांची लोकसंख्या गृहीत धरली तरी त्यांना प्रति महिना ११ लाख ८० हजार ३४१ क्विंटल अन्नधान्याची गरज आहे. धान्य बाजारात फेब्रुवारी २०२१ अखेर १९ लाख ५३ हजार १७९ क्विं टल अन्नधान्य शिल्लक आहे. हा साठा एक महिना १९ दिवस पुरेल इतका असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

धान्य आवक व साठा (क्विंटलमध्ये)

आवक          जावक     शिल्लक

जानेवारी   :        ९२४६२२    ५६६८३८  ३६७८८४

फेब्रुवारी :          ७९६०५४     ५३९०९८ २५६९५६

१,२६,९१,८३६

मुंबई व उपनगरांची

आंदाजे लोकसंख्या

प्रति माणशी  गरज

प्रति महिना        प्रति वर्षी

९.३० कि.        १११.५० कि.

नवी मुंबई शहरात पुन्हा करोना रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे टाळेबंदीच्या भीतीने किरकोळ ग्राहक खरेदीला येत आहेत. एपीएमसीमध्ये महिनाभर पुरेल इतका धान्यसाठा उपलब्ध आहे. ग्राहकांनी गर्दी न करता रोजच्या प्रमाणे खरेदी करावी.

– नीलेश वीरा, अन्नधान्य बाजार समिती, पीएमसी