26 September 2020

News Flash

मनमानी दंडाच्या माऱ्याने किरकोळ व्यापारी, दुकानदार बेजार

पोलीस आणि पालिका अधिकाऱ्यांच्या ‘समन्वया’ने व्यावसायिकांचा जाच सुरूच

पोलीस आणि पालिका अधिकाऱ्यांच्या ‘समन्वया’ने व्यावसायिकांचा जाच सुरूच; व्यापारी संघटना पालिका आयुक्तांना भेटणार

शेखर हंप्रस, लोकसत्ता

नवी मुंबई : एकीकडे केंद्र आणि राज्य शासन करोनाचा सामना करत आर्थिक गाडी रूळावर आणण्याचा कसोशीने प्रयत्न करीत असताना नवी मुंबईत मात्र पोलीस आणि पालिका अधिकाऱ्यांच्या मनमानीने किरकोळ व्यापारी मेटाकुटीला आले आहेत. दुकाने उघडण्याची परवानगी असूनही सामाजिक अंतर, गर्दी, संसर्गजन्य रोग प्रतिबंधित उपाय अशा विविध कारणांनी मनमानी दंड ठोठावला जात असल्याचे प्रकार मोठय़ा प्रमाणावर  घडत आहेत.

याविरोधात किरकोळ व्यापारी संघटनेचे पदाधिकारी पालिका आयुक्तांची भेट घेणार आहेत.  पोलीस आणि आरोग्य विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या कामगिरीचे नागरिक कौतुक करीत आहेत. मात्र, काही दिवसांपासून पोलिसांनी ताळतंत्र सोडल्याचा आरोप छोटय़ा व्यावसायिकांकडून होत आहे. पोलीस आणि विभाग कार्यालयातील काही लोक एकत्रित येऊन ही कारवाई करीत असल्याच्या तक्रारी व्यापाऱ्यांनी केल्या आहेत.

कारवाई करताना दुजाभाव केला जात असल्याचेही प्रकार घडत आहेत. गेल्या  महिन्यात सीबीडी बेलापूर येथे दुकान आणि घर एकाच गाळ्यात असलेल्या एका दुकानदाराने एका ग्राहकाला तांदूळ दिल्याची बाब एका पोलीस कर्मचाऱ्याने पाहिल्यानंतर त्याने थेट त्या व्यापाऱ्याला गाठून पाच हजार रुपयांची मागणी केली. मात्र, व्यापाऱ्याने पैसे देण्यास नकार दिल्याने उपस्थित असलेल्या काही लोकांनी दुकानदाराला साथ दिल्याने पोलिसाला नमते घ्यावे लागल्याचा प्रकार घडला. दुसऱ्या दिवशी विभाग कार्यालयातील लोकांना घेऊन तोच पोलीस कर्मचारी दुकानासमोर आला. हे प्रकरण सीबीडी पोलीस ठाण्यात गेले. मात्र, अद्याप त्याची दखल  पोलिसांनी घेतलेली नाही. संबंधित पोलीस कर्मचारी पोलीस आयुक्तालयात कार्यरत असल्याची माहितीही उजेडात येत आहे.

घडलेला प्रकार समाजमाध्यमांवर पसरला होता. याशिवाय सीबीडी येथे पालिकेचे एक पथक फळ विक्रेत्याला  सामाजिक अंतर राखले न गेल्याने दंड ठोठावल्याचा प्रकार उघड झाला आहे. त्यावेळी पालिका कर्मचाऱ्यांशिवाय या फळ विक्रेत्याकडे एकही ग्राहक नव्हता. हा प्रकारही समाजमाध्यमांवर पसरला होता. त्यासंदर्भात अद्याप कारवाई झालेली नाही.

टाळेबंदीत अनेक मिठाईची दुकाने सुरू ठेवण्यात आली, तर अनेक दुकाने बंद होती.  याबाबतही चौकशी केली असता नेरुळमधील एका मिठाईच्या दुकानदाराने हप्ता न दिल्याच्या कारणावरून दुकान बंद  ठेवण्यास सांगण्यात आल्याचे म्हटले. बारावीचा निकाल लागल्यावरही मोठय़ा प्रमाणात धंदा होत असूनही  उघडण्यात आलेल्या मिठाई दुकानांची संख्या तुरळक होती. त्यावर कारवाई झाली नाही. वास्तविक मिठाईच्या दुकानांना परवानगी नव्हती, असेही व्यापाऱ्याने सांगितले.

पहिल्या टाळेबंदीत आर्थिक फटका बसला आहे. छोटे व्यापारी पाच हजार दंड रक्कम देण्याऐवजी दोन हजार रुपये विनापावती देत असल्याने अधिकाऱ्यांचे फावत आहे.

अनेक औषध दुकानांमध्ये  फरसाण, बिस्किटे, शेव-चिवडा विकला जात असल्याची धक्कादायक माहिती एका व्यापाऱ्याने दिली. या प्रकारावर अद्याप कारवाई करण्यात आली नसल्याचे मत त्याने नोंदवले.

पोलीस आणि मनपा कर्मचारी एकत्रित येऊन दंड वसुली करताना अवास्तव दंड, दंड ठोठावण्यात दुजाभाव करणे असले प्रकार घडत आहेत. अगोदरच किरकोळ व्यापारी खचलेला आहे त्यात अशी दंडवसुली म्हणजे  व्यापाऱ्यांना जगू देणारे नाही. याविरोधात आम्ही पालिका आयुक्तांना लवकरच भेटणार आहोत.

-प्रमोद जोशी, अध्यक्ष नवी मुंबई किरकोळ व्यापारी संघटना

सदर कारवाईत पोलीस विभाग फक्त पालिका संरक्षण देतात. पोलीस असा दंड ठोठावू शकत नाहीत, तसा अधिकारच नाही. असे काही होत असेल तर कडक कारवाई  केली जाईल. नाकाबंदीबाबतही योग्य ते निर्देश दिले जातील.

-संजयकुमार, पोलीस आयुक्त

या बाबत आयुक्तांशी बोलून योग्य ती पावले उचलली जातील.

– सुजाता ढोले, अतिरिक्त आयुक्त, पालिका

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 22, 2020 4:53 am

Web Title: retailer shopkeeper harassed by police and civic officials in navi mumbai zws 70
Next Stories
1 पोलिसांची दडपशाही
2 Coronavirus : उपचार घेत असलेले रुग्ण केवळ ३३ टक्के
3 अनावश्यक खर्चाला कात्री
Just Now!
X