News Flash

पनवेलमध्ये रिक्षांचा मीटर ४० रुपये

प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून मीटरसाठी निश्चित केलेले भाडे न आकारता पनवेलमधील रिक्षाचालक मनमानी भाडे आकारत आहेत.

(संग्रहित छायाचित्र)

सीमा भोईर

मनमानी भाडे; मीटरविनाच धावतात रिक्षा

प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून मीटरसाठी निश्चित केलेले भाडे न आकारता पनवेलमधील रिक्षाचालक मनमानी भाडे आकारत आहेत. १८ रुपये मीटर भाडे असताना ४० रुपये प्रवाशांना मोजावे लागत आहे. बहुतांश रिक्षांना मीटरच नसतो तर परतीचे भाडे आकारले जात असल्याने प्रवाशी संतप्त आहेत.

गेल्या दहा वर्षांत पनवेलसह खारघर, कामोठे, तळोजा, नवीन पनवेल, खांदेश्वर, कळंबोली परिसराची लोकसंख्या दुप्पट ते तिप्पट वाढली आहे. लोकवस्ती वाढल्याने अनेक समस्यांना नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे. त्यात रिक्षाचालकांच्या मनमानीचा मोठा फटका प्रवाशंना बसत आहे.

मुळातच पनवेल रेल्वे स्टेशन ते पनवेल शहर हा लांबचा पल्ला आहे. त्यामुळे नागरिकांना बस किंवा रिक्षा हाच पर्याय असून प्रवाशी रिक्षांना पसंती देतात. याचाच फायदा हे रिक्षाचालक उठवत आहेत.

१०० मीटर अंतराचे मीटरनुसार फक्त १८ रुपये आकारणे बंधनकारक आहे. मात्र पनवेल, कळंबोली, तळोजा, नवीन पनवेल शहरात मीटरविना ४० रुपये आकारले जात आहेत. तसेच पनवेल शहरात जाण्यासाठी शेअररिक्षा नाहीत. फक्त सकाळी ९ ते ११ या वेळेतच ही सेवा मिळते. इतर वेळी एकटय़ा प्रवाशाला २२ रुपयांचा भरुदड प्रवाशंना सहन करावा लागत आहे.

पनवेल रेल्वे स्थानक ते तहसील कार्यालय ७० ते ८० रुपये तोंडी भाडे आकारले जाते. रात्रीच्या वेळेस  तर ते ९० ते  १०० रुपये घेतले जातात. पनवेल रेल्वे स्थानकापासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या पंचायत समितीत जाण्यासाठी ४० ते ५० रुपये मोजावे लागतात. पनवेल शहरात कितीही जवळचे अंतर असले तरी रिक्षाचे कमीत कमी भाडे हे ३० रुपये आहे. खारघर कळंबोली, नवीन पनवेल, तळोजा, खांदेशॉवर परिसरातही हीच परिस्थिती आहे. फक्त खारघरमध्ये स्टेशन परिसरातून २० रुपये मीटरने भाडे आकारले जात आहे.

जर एखाद्या रिक्षावाला कमी भाडे घेऊन जाण्यास तयार झाला तर इतर रिक्षावाले दादागिरी करतात. पनवेल, खारघर, कळंबोली, तळोजा करंजाडे परिसरात बससेवा सुरू झाल्याने रिक्षाच्या धंद्यावर परिमाण झाल्यामुळे मुद्दाम बसचालकाशी व वाहकाशी हे रिक्षाचालक तंटा करीत असतात.

रिक्षाचालकांच्या या मनमानी प्रकारामुळे प्रवाशी संताप व्यक्त करीत असून प्रादेशिक परिवहन विभागाने मीटर नसलेल्या रिक्षांवर कारवाई करून त्यांना मीटर बंधनकारक करावे, शहरात शेअर रिक्षा सुरू कराव्यात अशी मागणी प्रवाशंकडून होत आहे.

भाडे मीटरनुसारच आकारले जावे

पनवेल शहरात इतर वाहने कमी मात्र रिक्षाच जास्त अशी परिस्थिती असून आवर आरटोचे नियंत्रण असणे गरजेचे आहे. रिक्षाचे भाडे मीटरनुसारच आकारले जावे, अशी मागणी सिटीझन युनिटी फोरमचे  अरूण भिसे यांनी केली आहे. या संदर्भात आम्ही मोठा मोर्चाही काढला होता. मात्र पनवेलकरांनी याला प्रतिसाद न दिल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.

रिक्षाचालकांचा अलिखित नियम

एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी भाडे घेऊन गेल्यानंतर तेथून त्याला दुसरे भाडे स्वीकारता येत नाही. तेथून तो रिकामा परत यावे लागते, हा अलिखित नियम पनवेलमध्ये रिक्षाचलकांनी केला आहे. याचा भरुदड मात्र प्रवाशांना सहन करावा लागत आहे. कारण तो रिक्षाचालक त्याच्याकडून परतीचे भाडेही घेतो. त्यामुळे २० रुपये भाडे होत असेल तर प्रवाशांना ४० रुपये मोजावो लागत आहेत.

याच महिन्यात आम्ही विनामीटर ७० रिक्षांवर कारवाई केली आहे. प्रवाशांच्या तक्रारीसंदर्भात संकेतस्थळ आहे. नागरिकांना जर कोणत्याही अरेरावी अतिरिक्त भाडे यासंदर्भात तक्रारी असतील तर त्यांनी बिनदिक्कत तक्रार करावी. त्या तक्रारीची दखल घेत कारवाई केली जाईल.

– हेमांगिनी पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी

विनापरवाना रिक्षा घेऊन फिरणाऱ्या रिक्षांवर प्रादेशिक परिवहणने कारवाई करावी, आमची काहीही हरकत नाही. काही लोकांमुळे प्रामाणिक रिक्षाचालकांची बदनामी होत आहे.

– सुनील घरत, शिवश्री रिक्षा संघटना

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 30, 2019 12:36 am

Web Title: rickshaw meter 40 rupees in panvel
Next Stories
1 वर्षभरात मालमत्तांचे लिडार सर्वेक्षण
2 एपीएमसी बाजारात हापूसची विक्रमी आवक
3 जलकुंभ असुरक्षित!
Just Now!
X