मनुष्यबळाअभावी कागदपत्र पडताळणीसाठी विलंब; निवडणूक कामात कर्मचारी व्यस्त

नवी मुंबई पालिकेतील साठ टक्के कर्मचारी हे लोकसभा निवडणुकीच्या कामासाठी जुंपले गेल्याने शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) प्रवेश प्रक्रियेलाही याचा फटका बसला असून कागदपत्र पडताळणी संथ गतीने सुरू आहे. मात्र मुदतीत सर्व प्रक्रिया पूर्ण करण्याचे आश्वासन शिक्षण विभागाने दिले आहे.

शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) प्रवेश प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून कागदपत्रांची पडताळणी सुरू आहे.११ एप्रिलपासून पडताळणी सुरू असून २६ एप्रिलपर्यंत अंतिम मुदत आहे. त्यानुसार वाशी सेक्टर १५ येथील मनपा शाळा क्रमांक २८ मध्ये पडताळणीचे काम सुरू आहे. मात्र अधिकारी, कर्मचारी निवडणूक कामासाठी व्यस्त असल्याने कमी मनुष्यबळ असल्याने काम संथ गतीने सुरू आहे. आतापर्यंत केवळ १८९ विद्यार्थी प्रत्यक्ष लाभार्थी ठरले आहेत.

नवी मुंबईत शिक्षक हक्क अंतर्गत २ हजार ५६२ जागा राखीव असून पैकी पडताळणीमध्ये केवळ १ हजार ६६७ पात्र ठरले आहेत. मात्र त्यांची कागदपत्र पडताळणी पूर्ण होऊन त्याचा अहवाल राज्य शिक्षण विभागाला दिल्यानंतर प्रत्यक्ष त्या विद्यार्थाच्या पालकांना याबाबत पत्र देण्यात येते. असे आतापर्यंत १८९ विद्यार्थ्यांनाच आदेश पत्र देण्यात आले आहे.

लोकसभा निवडणूक असल्याने साठ टक्के पालिकेचे अधिकारी, कर्मचारी निवडणूक कामात व्यस्त आहेत. मनुष्यबळ नसल्याने कामास विलंब होत आहे. यापूर्वीही दोन वेळेस पालकांना पडताळणीसाठी बोलावण्यात आले, मात्र काही काम झाले नाही.

नवी मुंबई पालिकेतील साठ टक्के कर्मचारी हे लोकसभा निवडणुकीच्या कामासाठी जुंपले गेल्याने गेली पाच वर्षे सुरूअसलेले स्वच्छ भारत अभियानातील स्वच्छता बारगळल्याचे चित्रही नवी मुंबईत सर्वत्र दिसू लागले आहे. त्यामुळे अनेक सोसायटींच्या बाहेर कचऱ्याचे ढीग दिसू लागले आहेत.

निवडणूक कामात कर्मचारी व्यस्त असल्याने कामास विलंब होत आहे. मात्र अंतिम मुदत २६ एप्रिल असून दिलेल्या मुदतीत सर्व पडताळणी केली जाईल. पालकांनी संयम बाळगावा.    संदीप संगवे, शिक्षणाधिकारी, नवी मुंबई पालिका