अन्नधान्याचे दर वधारल्याने गणित बिघडले

पनवेल : परराज्यातून पोटाची खळगी भरण्यासाठी तळोजा व पनवेल औद्योगिक वसाहतीमधील विविध कारखान्यांमधील कंत्राटी कामगारांवर सध्या उपासमारीची वेळ आली आहे. गावातून नातेवाईकांचा घरी परतण्यासाठी फोन येत आहे तर ज्या ठिकाणी राहतात तेथील अन्नधान्याचे दर वधारल्याने रोजच्या जेवणाचे गणित बिघडले आहे. आगाऊ रक्कम देणाऱ्या ठेकेदारांनी व कारखान्यांनी अशावेळी काढता पाय घेतल्याने कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे.

तळोजा औद्योगिक वसाहतीमध्ये सुमारे पन्नास हजारांहून अधिक असंघटीत कामगार आहेत. याच कामगारांच्या कार्यकुशलतेमुळे तळोजातील उत्पादने परदेशात, देशात व राज्यातील कानाकोपऱ्यात पोहचतात. १२, १६ व २४ तास काम करण्याची क्षमता असल्याने कंत्राटी कामगार हे ठेकेदार व कारखानदारांच्या गळ्यातील ताईत झाले आहेत. मागील आठवडय़ापर्यंत उत्कृष्ट काम करण्याची ख्याती असणारे कंत्राटी कामगार मागील चार दिवसांपासून बिनकामाचे झाल्याने ते दुर्लक्षीत झाले आहेत. कारखाने बंद असल्याने भाडय़ाच्या घरात राहणारे सर्व कामगार मागील चार दिवसांपासून प्रत्येकी एका घरात पाचजण सामुहिकपणे राहतात. सध्या हे कामगार सर्वसामान्यांप्रमाणे घरातच कोंडून आहेत.

बुधवापर्यंत भाजीपाला माफक दरात मिळत होता, मात्र गुरुवारपासून तालुक्याच्या कृषी उत्पन्न बाजारात मालाची आवक कमी झाल्याने तालुक्यातील किरकोळ बाजारात भाजीपाल्याचे दर चढेच राहील्याने गावागावांमधील भाजीदर दुप्पटीने वाढले.

करोनाचे संकट महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात आल्याने हातात पैसे नसलेल्या कामगारांनी पोट कसे भरावे असा प्रश्न कामगारांना पडला आहे. गावाहून त्यांचे नातेवाईक बोलवत आहेत, मात्र सध्या येथे जेवणासाठी तांदुळ, गव्हाचे पीठ, डाळ नसल्याने कामगारांचे हाल झाले आहेत.

पालेभाज्यांच्या दराची शंभरी

पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये फ्लावर ६० रुपये किलो, वांगी ४० रुपये किलो, कांदा ५० रुपये किलो, लसून शंभर रुपये किलो, टोमॅटो ५० रुपये दराने गुरुवारी विक्री करण्यात आली. मात्र हाच दर पनवेलच्या किरकोळ बाजारात शंभरीच्या पुढे प्रति किलोदराने विक्री करताना अनेक ठिकाणी आढळून आले. या सर्व परिस्थितीमुळे तळोजा व पनवेलमधील विविध कारखान्यांमधील कामगारांमध्ये भितीचे वातावरण आहे.

घरात अन्नाचा दाणा नाही!

पनवेलमधील नवनाथ नगर झोपडपट्टीतील रहिवाशांनी त्यांची व्यथा मांडली. घरकाम करुन व वेटबिगारी करुन संसाराचा गाढा चालविणाऱ्यांची संख्या या वस्तीमध्ये मोठी आहे. येथे राहणाऱ्या लक्ष्मीबाई गायकवाड यांनी सांगीतले की, घराबाहेर पडता येत होते, म्हणून रोजचा उदरनिर्वाह सुरू होता. सध्या घराबाहेर पडता येत नाही, घरात अन्नाचा दाणा नाही, कुणाकडे उसने पैसे मागण्याची सोय नाही. घरी बसा सांगितले, तरी घरात जेवणाचे काय हा प्रश्न आहे.