एपीएमसीतील भाजी बाजारात सलग दुसऱ्या दिवशीही गर्दीवर नियंत्रण मिळविण्यात एपीएमसी प्रशासनाला अपयश आले. शनिवारी मध्यरात्रीनंतर भाजी बाजारात एक हजारपेक्षा जास्त ट्रक टेम्पो भरून आलेला भाजीपाला खरेदी करण्यासाठी खरेदीदारांनी प्रतिबंधक उपाय न करता एकच गर्दी केली होती. ही गर्दी करोना विषाणूला आमंत्रण देणारी ठरू शकते अशी चर्चा आहे.

देशातील टाळेबंदीचा आज चौथा दिवस आहे. टाळेबंदीच्या काळात जनतेला जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा कमी पडणार नाही याची हमी सरकारने दिली आहे. त्यासाठी तुर्भे येथील घाऊक भाजीपाला व धान्य बाजारपेठा खुल्या ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कोकण विभागीय आयुक्त शिवाजी दौंड यासाठी समन्वय करीत जीवनावश्यक वस्तूंच्या बाजारपेठा बंद ठेवल्यास परवाने रद्द करण्यात येतील असा इशारा दिला होता. त्यामुळे नाइलाजास्तव धान्य व भाजी बाजार सुरू करण्याचा निर्णय व्यापाऱ्यांनी घेतला. त्यानुसार शुक्रवारी भाजी बाजारातील आवक पाचशे ट्रक-टेम्पोच्या घरात गेली, त्यामुळे या ठिकाणी गर्दी झाली होती. या गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी एपीएमसी प्रशासनाने नियोजन केल्याचे सांगण्यात आले, मात्र शनिवारी या नियोजनाचा पुरता बोजवारा उडाला. सर्वसाधारपणे भाजी बाजारात पाचशे ते सहाशे ट्रक-टेम्पो भरून भाजी येत असते. मात्र शनिवारी दुप्पट आवक झाल्याने खरेदीदारांची पहाटेपासून झुंबड उडाली होती. त्यामुळे भाजी बाजाराला जत्रेचे स्वरूप आले होते. विशेष म्हणजे करोना विषाणूचा सामना करण्यासाठी सामजिक अंतर, जंतुनाशकांचा वापर आणि तोंडावर रुमाल अथवा मास्क लावण्याच्या सूचना धाब्यावर बसवल्या गेल्याचे दिसून आले.

यापुढे दोनशे ट्रकच सोडणार

भाजी बाजारात सकाळी जमलेली तोबा गर्दी पाहता सरकारने बाजारात एका वेळी केवळ दोनशे ट्रक टेम्पो बाजारात सोडण्याचे आदेश दिले आहेत. इतर वाहने ही बाजारापासून लांब अंतरावर उभी केली जाणार आहेत. नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी एपीएमसी भाजी बाजारात जमलेल्या गर्दीबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.

‘चालते बोलते बॉम्ब’

एपीएमसीत झालेल्या गर्दीमुळे बाजार समितीतील व्यापारीही धास्तावले आहेत. ‘परवाने रद्द झाले तरी चालतील, पण आम्ही आमच्या कामगारांचा व स्वत:चा जीव धोक्यात घालणार नाही’ असा पवित्रा व्यापाऱ्यांनी घेतला आहे. पहाटे आलेले खरेदीदार चालते बोलते मानवी बॉम्ब वाटत असल्याची प्रतिक्रिया काही व्यापाऱ्यांनी व्यक्त केली.