शहरात मंगळवार दुपापर्यंत करोनाबाधितांची नोंद झाली होती. मात्र हे रुग्ण परदेश प्रवास करून आलेल्यांच्या संपर्कात आले होते. मात्र मंगळवारी सायंकाळी अकरावा रुग्णही सापडला असून तो अनेकांच्या संपर्कात आल्याची शक्यता असल्याने शहरात आता करोना फैलावाचा धोका वाढला आहे.

मंगळवारी एका दिवसात वाशीत एक, नेरुळमध्ये एक आणि सीवूड्समध्ये एक असे तीन रुग्ण सापडले. तर बुधवारी नेरुळ आणि  कोपरखैरणेत प्रत्येकी एक रुग्ण सापडल्यामुळे शहरातील करोनाबाधितांची संख्या १३ झाली. यात सीवूड्समध्ये आढळलेल्या रुग्णाचा परेदशी प्रवाशाशी थेट संपर्क आलेला नाही अथवा त्याने स्वत: परदेश प्रवास केलेला नाही. त्यामुळे हा रुग्ण समूह संसर्गाचा रुग्ण असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. तसेच हा रुग्ण नेरुळ सेक्टर १५ मधील मशिदीमध्ये सुमारे ७५० जण उपस्थित असलेल्या नमाज पठणात सहभागी झाला होता, अशी माहिती पुढे येत आहे. याला पालिका अधिकाऱ्यांनीही दुजोरा दिला आहे. त्यामुळे त्याच्या संपर्कात आलेल्यांमध्ये करोनाचा संसर्ग होण्याचा धोका आहे.

सीवूड्स सेक्टर २७ परिसरातील एका नागरिकाला काही दिवसांपासून लक्षणे दिसत होती. त्याच्यावर अपोलो रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यानंतर त्याला कोपरखैरणे येथील रिलायन्स रुग्णालयात हलविण्यात आले. अपोलो रुग्णालयातही त्याचा वावर झाल्यामुळे त्या ठिकाणी कोणाला संसर्ग झाला आहे का याबाबत पालिका माहिती घेत आहे. अपोलो रुग्णालयाने दिलेल्या अहवालावरून त्यांनाही विचारणा करण्यात येणार असल्याची माहिती पालिका आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली. तसेच हा रुग्ण राहत असलेल्या इमारतीमधील सर्वाचे घरातच विलगीकरण करण्यात आले आहे. संबंधित रुग्णाच्या आई-वडिलांनाही घरी विलगीकरणात ठेवले आहे.

पालिका अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार हा रुग्ण २० मार्च रोजी नेरुळ सेक्टर १५ येथील मशिदीमध्ये नमाजात सहभागी झाला होता. त्या वेळी तेथे ७५० लोक उपस्थित होते, असा अंदाज आहे. नेरुळमधील जामा मशिदीचे पदाधिकारी फैयाज पारकर यांनी २० मार्च रोजी या ठिकाणी नमाज झाल्याची माहिती दिली.

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालिका सातत्याने प्रयत्नशील आहे. सीवूड्स येथील करोनाबाधिताला समूह संपर्कातून संसर्ग झाल्याचे निदर्शनास आले आहे. अपोलो रुग्णालयाचा अहवाल पाहून तेथेही विचारणा करण्यात येणार आहे.

– डॉ. बाळासाहेब सोनावणे, मुख्य वैद्यकीय अधिकारी.