चार वर्षांची मुलगी बचावली; सीवूड येथील घटना

आई व चार वर्षांच्या मुलीसोबत रात्री शतपावलीसाठी गेलेल्या एका तरुणावर काळाने घाला घातला. पदपथावर बसलेले असताना एका भरधाव मोटारीने या तिघांना उडविले. यात जखमी तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना जखमी आईला समजल्यावर तिचाही रुग्णालयात मृत्यू झाला. सुदैवाने यातून चार वर्षांची त्यांची मुलगी वाचली.

ललिता पाटील (वय ५५), मुलगा अमोल पाटील (वय ३५) अशी अपघातातील मृतांची नावे आहेत. हा अपघात सोमवारी रात्री साडे दहाच्या सुमारास सीवूड येथे पामबीचलगतच्या सेवारस्त्यावर सेक्टर ५० एनएमटी बसथांब्याजवळ झाला. या प्रकरणी आरोपी मोटारचालक आमिर मोहम्मद इस्माईल अन्सार (वय २१) याला पोलिसांनी अटक केली आहे.

या संदर्भात अधिक माहिती अशी की, सोमवारी रात्री ललिता पाटील, त्यांचा मुलगा अमोल आणि नात शतपावली करण्यासाठी गेले होते. फिरून झाल्यानंतर येथील पदपथाच्या काठावर ललिता बसल्या होत्या. त्यांच्यासमोरच अमोलने त्याची दुचाकी उभी करून तो मुलीला घेऊन बसला होता. आईशी गप्पा मारत असताना एक भरधाव चारचाकी मोटारीने त्यांना उडविले. मोटारीचा वेग एवढा जास्त होता की, तिच्याखाली दुचाकी व त्यावर बसलेला मुलगा अमोल चिरडला गेला. मात्र दैव बलवत्तर म्हणून चिमुरडी दुचाकीला धडक लागताच दूर फेकली गेली आणि ती वाचली. अपघात भीषण असल्याने मोटारीची एअर बॅगही उघडली गेली. अपघातानंतर मोटारचालक गाडीतच सुन्न होऊन बसला होता. आजूबाजूच्या नागरिकांनी त्याला पकडून त्याला एनआरआय पोलिसांच्या ताब्यात दिले, अशी माहिती प्रत्यक्षदर्शी व फिर्यादी संतोष सावंत यांनी दिली.

अपघातानंतर अमोल याला पालिका रुग्णालयाच्या शवागारात ठेवले तर त्याच्या आईला जखमी अवस्थेत नेरुळ येथील अपोलो रुग्णालयात दाखल केले. काही तपासणीनंतर आईची प्रकृती पूर्वपदावर येत होती. त्यातच त्यांना मुलगा गेल्याचे समजताच धक्का बसून त्यांचीही प्राणज्योत मालवली. त्यांना हृदयविकाराचा झटका आला असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील यांनी दिली. आरोपीकडे वाहन परवाना असला तरी त्याला गाडी व्यवस्थित चालवता येत नसल्याची शक्यता आहे. ब्रेकऐवजी चुकून एक्सलेटरवर दाबल्याने हा अपघात झाल्याची शक्यता प्रत्यक्षदर्शीनी व्यक्त केली.

हे पाटील कुटुंबीय येथील साई संगम सोसायटीत राहात होते. अमोलच्या वडिलांची काही महिन्यापूर्वी बायपास सर्जरी झालेली आहे. पत्नी गरोदर आहे. त्यांना ललिता आणि अमोल यांच्या अपघाती मृत्यूविषयी दुसऱ्या दिवसापर्यंत कळविण्यात आले नाही. अमोलचा मोठा भाऊ  अमेरिकेत राहात असून बहीण एका बँकेत नोकरी करते. अमोलचा भाऊ बुधवारी सकाळी मुंबईत येणार असून त्यानंतर सांगली येथे मूळ गावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार असल्याचे सोसायटीचे अध्यक्ष प्रकाश पारकर यांनी सांगितले.

सेवा रस्त्यावर गाडी शिकणे धोक्याचे

या सेवा रस्त्यावर फारशी रहदारी नसल्याने सकाळी व सायंकाळी धावण्यासाठी व रात्री शतपावलीसाठी नागरिक मोठय़ा प्रमाणात येतात. तसेच या रस्त्याचा वापर दुचाकी व चारचाकी गाडी शिकणारेही असतात. गाडी शिकण्याचे प्रशिक्षण मान्यताप्राप्त संस्थेकडून न घेता नातेवाईक, मित्रच गाडी शिकवत असतात. त्यामुळे अनेक छोटे-मोठे अपघात घडतात. या अपघातानंतर तरी धडा घ्यावा, असे शिवसेना शाखा प्रमुख समीर बागवान यांनी सांगितले.