अनधिकृतपणे कच्चे रस्ते महामार्गाला जोडल्याने धोका; प्रवाशांची बेफिकिरी; यंत्रणांचे दुर्लक्ष

मुंबईतून येणारा शीव-पनवेल महामार्ग कळंबोलीजवळ जेथे संपतो, तेथून सुरू होतो यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्ग. हा मार्ग किती धोकादायक आणि असुरक्षित आहे याची पहिली प्रचीती येते ती तेथेच. तेथे, उड्डाणपुलाच्या थोडे मागे रस्त्याच्या कडेला एक मोठे हॉटेल आहे. त्याच्यासमोर छोटासा कच्चा रस्ता. तो अनधिकृतरीत्या महामार्गाला जोडण्यात आला आहे. तेथून उड्डाणपुलावर जाणाऱ्या वाहनाला पनवेलकडे जाणारा मार्ग ओलांडावा लागतो. या मार्गावरून वेगाने वाहने येत असतात. त्यात अचानक या रस्त्यावरची वाहने घुसली की अपघाताचीच शक्यता. बऱ्याचदा तेथे असे अपघात झालेही आहेत.

तेथून उड्डाणपुलावर आल्यावर पुण्याच्या दिशेने निघालेले प्रवासी. ट्रॅव्हल कंपन्यांच्या गाडय़ांचा तेथे प्रवासी थांबाच बनला आहे. तो अर्थातच अनधिकृत. पुढेही या महामार्गावर ठिकठिकाणी असे थांबे दिसतात. रसायनी पुलाखालचा थांबा हा त्यातलाच एक. तेथे तर पुलावरून खाली उतरण्यासाठी पायऱ्याच तयार केलेल्या आहेत. त्यांवरून उतरायचे. महामार्गावर पुलाखाली उभे राहायचे. खालापूर टोलनाक्यापुढील पुलाखालीही असेच चित्र. थांबे अनधिकृत, प्रवासी अनधिकृत, तेथे गाड्या थांबविणेही बेकायदा. पण महामार्गावर कोठेही वाहने थांबवू नयेत या फलकांना वाकुल्या दाखवत प्रवासी वाहने तेथे थांबतात.

द्रुतगती मार्ग हा तसा एकला चालो रे तत्त्वातला. काही ठिकाणचे अधिकृत बायपास सोडले तर या मार्गावर येण्या-जाण्यासाठी अन्य वाट नाही.भाताण गाव त्यातलेच. या बोगद्याच्या अलीकडे पनवेलच्या दिशेने सुमारे ५०० मीटरवर अशीच एक वाट थेट महामार्गाला येऊन भिडते. पुण्याच्या दिशेन जायचे असेल, तर काही अडचण नसते. पण या गावचा अधिक संबंध पनवेल, कळंबोलीशी. तिकडे जायचे तर या वाटने पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर यायचे. तेथून सुसाट वेगाने धावणाऱ्या वाहनांचा अंदाज घ्यायचा आणि सगळ्या लेन ओलांडून आपली गाडी मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर वळवायची. अशी ती कसरत चालते.

(क्रमश:)

..मार्गात सायकलस्वारही

या मार्गावरून प्रवास करीत असताना अचानक एक सायकलस्वार दिसला. हा कोठून आला म्हणून पाहिले, छोटीशी एक वाट या मार्गाला जोडलेली होती. तेथून हा द्रुतगती मार्गावर आला होता. थोडे अंतर तो पुढे गेला आणि लगेच दुसऱ्या एका कच्च्या वाटेने आत गावाच्या दिशेने गेला. आणि हे सगळे घडत होते पोलिसांच्या पत्र्याच्या टपरीपासून काही अंतरावर. या अशा चोरटय़ा वाटांमुळेच महामार्गावर जनावरे येतात. अशा वेळी अपघातांना आमंत्रण मिळते