गेल्या वर्षांपासून कामोठे वसाहतीचा पनवेल-शीव महामार्गाला जोडणारा रस्ता बंद आहे. त्यामुळे वाहनचालकांना मुंबईकडे जाण्यासाठी सुमारे एक किलोमीटर अंतर कापून कळंबोली वसाहत थांब्याला वळसा द्यावा लागत आहे. सरकारमधील समन्वयाच्या अभावामुळे नागरिकांना पायपीट करावी लागत आहे. अद्याप दोन महिने तरी ती करावी लागणार असल्याचे संबंधित खात्याकडून सांगण्यात आले आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाने वर्षभरापूर्वी रातोरात खारघरचा टोलनाका सुरू करताना जशी कार्यतत्परता दाखविली, तशीच कार्यतत्परता कामोठेचा महामार्गातील अडथळे दूर करण्यासाठी दाखवलेली नाही. विशेष म्हणजे या मार्गातील कांदळवने नष्ट होत असल्याने या मार्गाचे काम रोखले गेले आहे; परंतु या रखडलेल्या मार्गाशेजारी सिडकोच्या जलवाहिनीच्या कामाला पर्यावरण विभागाने मंजुरी दिली आहे. रस्त्याच्या कामाला पर्यावरण विभागाकडून काही मंजुऱ्या शिल्लक आहेत.

सार्वजनिक बांधकाम विभागाने कळंबोली ते सायन या महामार्गाचे रुंदीकरण आणि काँक्रिटीकरण केले. अध्र्या तासात कळंबोली-सायन गाठता येईल, इतका जलद प्रवास करून देण्यात आला आहे. तसेच खारघर टोलनाका सुरू करताना हा रस्ता बांधणाऱ्या सायन पनवेल टोलवेज प्रा. लिमिटेड (एसपीटीपीएल) या कंपनीने ८० टक्के काम पूर्ण केले होते. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तत्कालीन अधिकाऱ्यांनी सहा महिन्यांत एसपीटीपीएल ही कंपनी संपूर्ण काम पूर्ण करेल, असाही दावा केला होता. मात्र प्रत्यक्षात तसे झाले नाही. दावा करणाऱ्या अधिकाऱ्यांची बदली झाली. या वसाहतीमधील प्रवाशांना महामार्गावर बससेवेचा लाभ घेण्यासाठी महामार्गावर अर्धा किलोमीटर चालत येऊन उभे राहावे लागते. विशेष म्हणजे येथे प्रवाशांना उभे राहण्याची कोणतीही सोय नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाने काम सुरू करण्याआधी कामोठे परिसरातील महामार्गात अडथळा येणाऱ्या कांदळवनाच्या पुनरेपणाकरिता वन विभागाकडून मंजुरी घेतली नव्हती, असाही खुलासा वन विभागाकडून होत आहे. कामोठेवासीयांची ही अडचण दूर होण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांनी नागरिकांची स्वाक्षरी मोहीम राबविली, या मोहिमेमधील हजारो स्वाक्षऱ्या संबंधित विभागाच्या मुख्य अभियंत्यांकडे पाठविला तसेच पनवेलच्या सिटिझन युनिटी फोरम (कफ) या सामाजिक संघटनेने सार्वजनिक बांधकाम विभागाला लेखी निवेदन दिले आहे.

कामोठे येथील महामार्गाजवळचे काम सुरू करण्यासाठी आम्ही नुकतेच वन विभागाचे अधिकारी यांच्यासोबत संबंधित ठिकाणी संयुक्त भेट दिली. वन विभागाला आमच्या विभागाकडून लवकरच कांदळवनांच्या पुनरेपणाचा प्रस्ताव दिला जाईल. त्याच्या मान्यतेनंतर कळंबोली सायन महामार्गातील थांबलेले काम सुरू होईल. यासाठी दोन महिन्यांचा अवधी लागेल.

सतीश सावगे,  सार्वजनिक बांधकाम विभाग, कार्यकारी अभियंता