सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन

पनवेलपासून मुंब्रा दिशेकडे जाताना कळंबोली सर्कल ते रोडपाली जंक्शन या दीड किलोमीटरच्या पट्टय़ात पाच वर्षांत १६८ जणांचा अपघाती बळी गेल्याच्या वृत्ताची दखल राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे. त्यामुळे महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी या वेळी दिले.

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाची स्थिती आणि वाहतुकीची पाहणी गुरुवारी केलेल्या दौऱ्यात केली. या वेळी त्यांनी ही माहिती दिली. कळंबोली सर्कल ते शिळफाटापर्यंत अरुंद रस्त्यामुळे अनेकांचे बळी गेले आहेत. कळंबोली सर्कल ते कळंबोली वसाहत या एका किलोमीटरच्या पट्टय़ात महामार्गाशेजारी रात्रीच्यावेळी उभी असणारी अवजड वाहने याला कारणीभूत असल्याचे प्रवाशांचे मत आहे. वाहतूक पोलिसांच्या दुर्लक्षित कारभारामुळे महामार्गाच्या दुतर्फा अवजड वाहने उभी केली जातात. त्यामुळे या दीड किलोमीटरच्या पट्टय़ात मार्गावरून वाहन चालविणे वाहनचालकांसाठी धोक्याचे बनले आहे.

विशेष म्हणजे ज्या दीड किलोमीटरच्या पट्टय़ात पाच वर्षांत १६८ जणांचे अपघातामध्ये बळी गेलेत. त्याच मार्गाची टोलवसुली रोहिंजण गावाजवळ आयआरबी कंपनी करीत आहे. मात्र रस्ता रुंदीकरणासाठी निधी वापरण्याची सरकारची इच्छा नाही, असा आरोप वाहनचालक करीत आहेत.