दिघा-रबाळे एमआयडीसीत पायाभूत सुविधांची वाणवा

शेखर हंप्रस
नवी मुंबई : दिघा-रबाळे एमआयडीसीमध्ये एकूण २६ किलोमीटरच्या आसपास रस्ते आहेत. त्यापैकी २१ किलोमीटरच्या रस्त्यांसाठी २५५ कोंटींचा निधी मिळाला आहे. मात्र २०१७ पासून ही कामे अद्याप पूर्णत्वास गेली नाहीत. त्यामुळे येथील खडतर प्रवास कायम आहे. रस्त्यांवर मोठ-मोठे खड्डे पडले असून पावसात त्यात पाण्याची तळी साचत आहेत. खड्डय़ांचा अंदाज येत नसल्याने वाहनांचे अपघातही होत आहेत. त्यामुळे उद्योजकांसह सर्वच घटकांत तीव्र नाराजी आहे. साठ वर्षांनंतर प्रशासन पायाभूत सुविधा पुरवू शकत नसल्याची खंत व्यक्त होत आहे.

येथील रस्त्यांची २०१७ पासून ही कामे सुरू आहेत. फेब्रुवारी २०२० पर्यंत सुसज्ज रस्ते करणे अपेक्षित होते. मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने हे रस्ते आजही पूर्णत्वास गेलेले नाहीत. त्यामुळे गेल्या आठवडय़ात झालेल्या मोठय़ा पावसात येथील रस्ते पाण्यात गेले होते. त्यामुळे उद्योजकांसह वाहतूकदार व कर्मचाऱ्यांना याचा फटका बसला.प्रशासनाकडून रस्ते पूर्ण होत आल्याचे सांगण्यात येत असले तरी अद्याप एकही ठिकाणी पदपथ, दुभाजाकावरील सुशोभीकरण, पथदिवे, बस थांब्यांसाठी जागा यापैकी काहीही तयार नाही. काही ठिकाणीच रस्ते बांधण्यात आले आहेत, असा दावा उद्योजक प्रकाश नारायण यांनी केला. जी कामे झाली आहेत त्याचेही नियोजन पूर्णपणे चुकले असून रस्त्यांचे नियोजन कसे नसावे याचा पुरावा मागच्या आठवडय़ातील पावसाने दिला आहे. रस्ते बनवताना एकीकडे पारसिक डोंगररांग ज्यातून मोठय़ा प्रमाणात पावसाच्या पाण्याचे लोट येत असल्याने हे रस्ते पाण्यात जात आहेत. पाण्याला मार्गच ठेवण्यात आले नाहीत. स्ते बनवताना डोंगरावरून येणाऱ्या पाण्याचा निचरा कसा केला जाईल याचे नियोजनच करण्यात आले नाही. भूखंड विक्रीतून मिळणाऱ्या मलिद्यावर नजर असल्याने एमआयडीसी अधिकाऱ्यांनी नाल्याशेजारील भूखंड विकलेच, शिवाय त्यावर उभ्या राहणाऱ्या कारखान्यांचे नाल्यावर झालेल्या अतिक्रमणाकडे सपशेल डोळेझाक केली. परिणामी रबाळेत रस्त्यावरील पाणी आणि नाल्यातील पाणी याची पातळी समान झाल्याचे चित्र दिसत होते असा दावा येथील उद्योजकांनी केला आहे.

कोटय़वधींचा महसूल एमआयडीसी, नवी मुंबई मनापा तसेच सरकार विविध करांतून आमच्याकडून वसूल करते. मात्र सुविधांच्या नावाने बोंब असते. ६० वर्षांत पक्के रस्ते देऊ  शकले नाहीत. कर वसुलीस मात्र अनेक आस्थापना उतावीळ असतात. ही अवस्था देशातील सर्वात मोठय़ा औद्योगिक वसाहतीची आहे. हे अत्यंत क्लेश देणारे असल्याचे लघू उद्योग संघटनेचे अध्यक्ष के.आर.गोपी  यांनी सांगितले, तर एमआयडीसीमधील काही मुख्य रस्ते चांगले झाले आहेत. मात्र अंतर्गत रस्त्यांची वाट लागली आहे. त्यामुळे एमआयडीसीत जायचे म्हणजे गाडीला हमखास खर्च निघतोच. पावसाळ्यात रबाळे दिघा परिसरात जायचे म्हणजे अंगावर काटा येतो, असे येथील एका वाहतूकदार ट्रकचालक अशोक कांबळे यांनी सांगितले.

नियोजन शून्य कारभार

रबाळे दिघा एमआयडीसी परिसरात अनागोंदी कारभार सुरू असून रस्ते, पदपथ गटारे आणि मलनिस्सारण वाहिनीची कामे अर्धवट आहेत. नियोजन शून्य कारभार सुरू असल्याचे नुकत्याच झालेल्या पावसाने दाखवून दिले आहे. भराव टाकून भूखंड विक्री, आर २२३ ते साईबाबा नगर अ‍ॅन्थोनी गॅरेज परिसरातून वाहणारा नाला जवळपास बंदच केला आहे. हीच परिस्थिती आर ५१० येथील आहे. साईनगर उच्च दाबाच्या वाहिन्यांखालीही भूखंड काढलेले आहेत, नाल्यावरील भूखंड विकले आहेत. पैशांच्या हव्यासापोटी हे केले असल्याचे द्योजक व माजी महापौर सुधाकर सोनावणे  यांनी सांगितले.

मुदत संपल्यानंतरही दिड वर्षे रखडपट्टी

दिघा व रबाळे एमआयडीसी पट्टय़ात छपाई, बँकिंग, कॉल सेंटर, गॅरेज, अभियांत्रिकी कारखाने मोठय़ा प्रमाणावर आहेत. येथील रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब होती. २०१७ मध्ये २५५ कोटी रुपयांचा निधी येथील रस्ते बांधकामाला मंजूर करण्यात आला. यात दोन्ही बाजूचे मिळून चार पदरी सिमेंट काँक्रीटीकरण रस्ते विस्तृत पदपथ, दुभाजकातील झाडे, पथदिवे बस थांबे अशा सुविधांचा समावेश करण्यात आला होता. फेब्रुवारी २०२० मध्ये ही सर्व कामे पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र अद्याप हे काम रखडलेलेच आहे.

रबाळे व दिघा परिसरांतील २१ किलोमीटरचे रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. करोना काळात कामगारांचा तुटवडा पडल्याने कामास उशीर झाला होता. काही दिवसांपूर्वी प्रचंड पाऊस झाल्याने पाणी साठले होते. मात्र असे फार क्वचित घडते. सध्याही पाऊस सुरू आहे, मात्र पाणी साठत नाही.

-एम एस कलकुटकी, कार्यकारी अभियंता, एमआयडीसी