रस्ते पाण्याखाली; धारण तलाव गाळाने तुंबले; पाणी अडविण्याची यंत्रणा निकामी

उरणमध्ये भरतीच्या पाण्याचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. २१ फेब्रुवारी रोजी कुंडे गावात पाणी शिरून २५ ते ३० घरांचे नुकसान झाले होते. तोच प्रकार पुन्हा २० मार्च रोजीही घडला. तर शुक्रवारी उरण-पनवेल या मार्गावर पुन्हा समुद्राच्या भरतीचे पाणी आल्याने रस्ते पाण्याखाली गेले होते. यामुळे येथील नागरिक धास्तावले आहेत.

धारण तलाव गाळाने तुंबल्याने तसेच भरतीचे पाणी परिसरात येऊच नये म्हणून पाणी अडविण्यासाठी उभारण्यात आलेली यंत्रणाही निकामी झाल्याने हे प्रकार वारंवार घडत आहेत.

नवी मुंबईच्या विकासाचाच एक भाग असलेल्या उरणमध्ये सिडकोने रस्त्यांचे जाळे तयार केले असून काही प्रमाणात सार्वजनिक बांधकाम विभागाचेही रस्ते आहेत. यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उरण-पनवेल तसेच उरण ते पेणला जोडणाऱ्या रस्त्यांची उंची इतर रस्त्यांच्या तुलनेत कमी झाली आहे. तर येथील समुद्राच्या पाण्याच्या ये-जा करणाऱ्या नैसर्गिक वाटा तसेच नाले बुजविण्यात आल्याने उधाणाच्या वेळी आलेले समुद्राच्या भरतीचे पाणी परतीचे मार्गच बंद होऊ लागल्याने रस्त्यावरच साचू लागले आहे. त्यामुळे हे रस्ते नादुरुस्त होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

उरण हा परिसर खाडीकिनारी असल्याने सखल भाग आहे. त्यातच खाडीतील पाणी दिवसातून दोन वेळा येणाऱ्या भरती आणि ओहोटीमुळे ये-जा करीत असते. त्यासाठी नैसर्गिकच नाले तयार झालेले होते. मात्र हे नाले वळवून तसेच बंद करून पर्यायी मार्ग काढण्यात आले आहेत. यातील अनेक मार्ग नष्टच झाले आहेत. त्यामुळे भरतीच्या वेळी आलेले पाणी परत जात नाही. त्यामुळे उरण-पनवेल महार्गावरील सिडको कार्यालय ते वीर वाजेकर महाविद्यालय यांच्या दरम्यानच्या रस्त्यावर मोठय़ा उधाणाच्या वेळी पाणी साचत आहे.

धारण तलाव व साचलेला गाळ तसेच भरतीचे पाणी येऊ नये याकरिता मुख्य नाल्यावर बसविण्यात आलेली झाकणे न्यायालयाच्या आदेशाने काढावी लागल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे. या समस्येवर मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जात आहे.

– रमेश गिरी, अधीक्षक अभियंता, सिडको