उत्पादन शुल्क विभाग, पोलिसांचे कारवाईचे आदेश

नवी मुंबईतील मद्यविक्रीच्या दुकानांबाहेर रस्ते आणि पदपथांवर खुलेआम मद्यपान करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या निर्णय उत्पादन शुल्क विभाग आणि पोलिसांनी घेतला आहे. शहरातील सर्वच मद्यविक्री दुकाने आणि परिसराची पाहणी करून आक्षेपार्ह प्रकार घडत असल्यास कारवाई करण्याचे आदेश दिल्याची माहिती ठाणे उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नाना पाटील यांनी दिली. स्थानिक पोलीस ठाण्यांनाही आपापल्या विभागातील मद्यविक्री दुकानांसमोर मद्यपान करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

नवी मुंबईत रस्तोरस्ती मद्यविक्रीच्या दुकानांसमोरच खुले बार सुरू असल्याचे वृत्त ‘लोकसत्ता महामुंबई’मध्ये प्रसिद्ध झाले होते. त्याची दखल घेत दोन्ही विभागांनी कारवाईचे निर्देश दिले आहेत. बेलापूरमध्ये तर पोलीस ठाण्याच्या बाजूलाच असलेल्या मद्यविक्री दुकानाबाहेरही खुलेआम मद्यपान सुरू असे.

बेलापूरमध्येच रेल्वे स्थानक परिसरात मद्य्विक्री दुकानाबाहेर संध्याकाळी सातनंतर उभे राहण्यासाठी जागा शिल्लक राहत नाही, एवढे तळीराम गोळा होतात, मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत होते. या पाश्र्वभूमीवर पोलीस उपायुक्तांनी सर्वच पोलीस ठाण्यांना उघडय़ावर मद्यपान करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

ठाणे जिल्हा राज्य उत्पादनशुल्क विभागाअंतर्गत नवी मुंबईत असलेल्या एफ, ई, डी या तीनही विभागांची म्हणजेच बेलापूर ते दिघ्यापर्यंतच्या दुकानांची पाहणी करण्यात येणार आहे.

कारवाईचा बडगा

शहरातील उत्पादन शुल्क विभागाच्या निरीक्षकाकडून दुकानांवर विभागीय विसंगतीचे गुन्हे दाखल केले जातात. ही प्रकरणे अधीक्षकांकडे आणि नंतर ठाणे जिल्हाधिकाऱ्यांकडे जातात. जिल्हाधिकारी नियमभंग करणाऱ्या दुकानांना ५० हजार रुपयांपर्यंत दंड आकारतात. मद्यविक्री दुकानांबाहेर मद्यपान करताना आढळल्यास स्थानिक पोलीस त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल करतात.

रस्त्यावर मद्यपान करणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात येते. आता शहरातील सर्वच ठाण्यांना निर्देश दिले असून दुकानांच्या परिसरांची झाडाझडती घेण्यात येईल. दंडात्मक कारवाई होईल, गुन्हे नोंदवण्यात येतील. तसे निर्देश वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना दिले आहेत.

डॉ. सुधाकर पाठारे, उपायुक्त, परिमंडळ १

राज्य उत्पादन शुल्क विभागाने परवाना दिलेल्या दुकानांबाहेर खुलेआम मद्यप्राशन करण्यात येत असल्यासंदर्भात सर्वच मद्यविक्री दुकानांची पाहणी करून नियमानुसार कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मंगळवारपासूनच या कारवाईला सुरवात करण्यात येत आहे.

नाना पाटील, अधीक्षक, ठाणे जिल्हा राज्य उत्पादनशुल्क