नवी मुंबई : लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लुटल्याची घटना ठाणे-बेलापूर मार्गावर घडली. आठवडाभरातील ही दुसरी घटना असून संशयित लुटारूंचा पोलीस शोध घेत आहेत.

रात्रीच्या वेळी ‘लिफ्ट’ देण्याच्या बहाण्यानेप्रवाशांना लुटल्याच्या घटना घडल्या आहेत. याआधी शीव-पनवेल महामार्गावर अशा अनेक टोळ्या सक्रिय होत्या. त्यातील दोन टोळ्यांचा बीमोड पोलिसांनी केल्यानंतर असे प्रकार बंद झाले होते. त्याच वेळी ज्या ठिकाणी वारंवार अशा घटना घडतात, तेथे गस्त वाढविल्यानंतर वाटमारीच्या प्रकारांना आळा बसला होता. मात्र आता ठाणे-बेलापूर मार्गावर प्रवाशांना लुटले जात असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. यात १६ फेब्रुवारी रोजी पहाटे कळवा येथून भाजीपाला विक्रेता बालवीर जैस्वाल वाशी बाजारात (एपीएमसी) येत असताना त्याने लिफ्ट घेतली, मात्र रबाळे परिसरात आल्यावर वस्तऱ्याने वार करून त्याला जखमी करण्यात आले. त्यानंतर त्याच्याकडून २२ हजार रुपयांची रोकड घेऊन आरोपी फरार झाले.

त्यानंतर २१ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री जिग्नेश शहा यांना घणसोली स्थानकाजवळ एका कारचालकाने डोंबिवलीसाठी ‘लिफ्ट’ दिली. मात्र कारमध्ये आधीच काही व्यक्ती बसलेले होते. महापे एमआयडीसीजवळ कार येताच त्यातील काही व्यक्तींनी जिग्नेश यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यांनी शहा यांच्याकडील मोबाइल, गळ्यातील सोन्याची साखळी हिसकावून घेतली आणि धाक दाखवून एटीएम कार्डचा ‘पासवर्ड’ मिळविला. शहा यांच्याकडील सर्व ऐवज लुटल्यावर त्यांना एके ठिकाणी सोडण्यात आले. त्यानंतर कारमधील सर्व जण फरार झाले.