दोन चोरटय़ांना अटक

खारघर व नवीन पनवेल वसाहतींमध्ये रविवारी सोनसाखळी चोरण्याच्या दोन घटना घडल्या. यातील नवीन पनवेलच्या घटनेतील चोरटय़ाला रहिवाशांनी रंगेहाथ पकडून त्याच्याकडून चोरीचा मुद्देमाल काढून घेतला, तर खारघरमध्येही पोलिसांच्या हाती दहा सोनसाखळ्या चोरणारा चोर सापडल्याची माहिती पनवेलचे सहाय्यक पोलीस आयुक्त शेषराव सूर्यवंशी यांनी दिली.
खारघरमध्ये सेक्टर १५ येथे भाजी विक्री करणाऱ्या मीना कारंडे दुपारच्या वेळी सेक्टर १९ येथील शहा ग्रुप इमारतीसमोरील मार्गावरून रविवारी दुपारी जात असताना दुचाकीवरून आलेल्या दुकलीने कारंडे यांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरली. कारंडे यांनी खारघर पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार नोंदविली असून, त्यांच्या साखळीची किंमत अंदाजे एक लाख दहा हजार रुपये आहे.
दुसऱ्या घटनेमध्ये नवीन पनवेल येथे राहणाऱ्या स्मिता राय या विसपुते वसतिगृहासमोरील रस्त्यावरून जात असताना त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी दुचाकीवरून आलेल्या चोरटय़ांनी खेचली.
त्या दरम्यान राय यांच्यासह येथील रहिवाशांनी सतर्कतेने या चोरटय़ाला रंगेहाथ पकडले. रहिवाशांनी या चोरटय़ाची अंगझडती घेतली. त्याच्याकडे राय यांच्या गळ्यातील ७५ हजार रुपये किमतीची सोनसाखळी सापडली. त्यानंतर जमलेल्या रहिवाशांनी संबंधित चोरटय़ाला चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केले.
सिडको वसाहतीसह पनवेल शहरामध्ये सोनसाखळी चोरीच्या घटना वाढल्या आहेत. खारघरमध्ये हे प्रमाण जास्त आहे. खारघर पोलिसांनी दहा सोनसाखळ्या चोरणाऱ्या चोरटय़ाला पकडले आहे.
दिवाळीत सोनसाखळी चोरांनी वसाहतीमध्ये धुमाकूळ घातला होता. दोन्ही चोरटय़ांकडून पोलिसांना आणखी गुन्ह्य़ांची माहिती मिळवायची असल्याने त्यांची नावे गुप्त ठेवली आहेत.