21 November 2017

News Flash

पाच महिने ‘त्या’ भुयाराचे खोदकाम

बँकफोडीत दोन कोटींची लूट झाल्याचा अंदाज, २७ तक्रारी दाखल

विशेष प्रतिनिधी, नवी मुंबई | Updated: November 15, 2017 2:04 AM

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

बँकफोडीत दोन कोटींची लूट झाल्याचा अंदाज, २७ तक्रारी दाखल

बँकेची सुरक्षा व्यवस्था आणि नवी मुंबईतील कायदा व सुव्यवस्था यांचे धिंडवडे काढणाऱ्या, जुईनगरमधील बँकफोडीसाठी भुयार खोदण्याचे काम तब्बल पाच महिने सुरू होते, असे आता उघड झाले आहे. बँक ऑफ बडोदाच्या ३० लॉकरमधून एकूण दोन कोटी रुपयांची लूट झाल्याचा तर्क असून ३० खातेधारकांच्यावतीने २७ तक्रारी दाखल झाल्या आहेत. गुन्हेगारांच्या शोधासाठी पोलिसांची विशेष पथके उत्तरांचल आणि उत्तर प्रदेशला गेली आहेत.

एखाद्या चित्रपटात शोभेल अशाप्रकारे हा बँकफोडीचा कट रचला गेला. जुईनगर सेक्टर ११मधील आठ मजली भक्ती रेसिडन्सी या इमारतीच्या तळमजल्यावर आठ व्यावसायिक गाळे आहेत. त्यातील चार गाळ्यांत बँकेची शाखा होती. त्याच्या बाजूचे चार गाळे रिकामेच होते. किराणा मालाचे दुकान टाकायचे आहे, असे सांगून चार जणांच्या टोळीने गाळेमालक शरद कोठावळे यांच्याशी संपर्क साधला. एक लाख रुपये अनामत रक्कम आणि वीस हजार रुपये दरमहा भाडे यावर एकमत होऊन पाच महिन्यांपूर्वी या टोळीतील येना प्रसादने भाडेकरार केला. या टोळीने बँकेजवळील सात क्रमांकाचा गाळा अशा प्रकारे मिळवला. तेथे फर्निचरचे काम चालल्याचे भासवले जात होते आणि त्या आवाजात प्रत्यक्षात भुयार खोदले जात होते. फर्निचरचे काम जोरात सुरू असल्याने परिसरातील रहिवाशांना संशय आला नाही.

भुयार खोदताना ते कोसळू नये म्हणून त्याला लाकडी बांबूची परात लावली जात होती. ३० मीटरचे भुयार खोदून झाल्यावर शनिवार आणि रविवारी बँकेची सुटी लक्षात घेऊन अखेर बँकफोडी केली गेली. २३७पैकी ३० लॉकरमधील कागदपत्रे वगळता सोने चांदी घेऊन ही टोळी परागंदा झाली. गुन्हा उघडकीस आला तोवर ही टोळी बरीच दूरवर पसार झाल्याचा तर्क असून विशेष पथके त्यांच्या मागावर रवाना झाली आहेत.

दरोडा नव्हे घरफोडी!

पोलिसांच्या मते हा दरोडा नसून घरफोडीचा गुन्हा आहे. शस्त्राचा धाक दाखवून पाच पेक्षा जास्त गुन्हेगारांनी एखाद्या व्यक्तीला लुटणे म्हणजे दरोडा, असे आयपीसी कायद्यात म्हटले आहे. त्यासाठी ३९५वे कलम असून या गुन्ह्य़ात दोन ते दहा वर्षे शिक्षा होऊ शकते.

दरोडय़ात एखाद्याचा जीव गेल्यास गुन्हेगाराला फाशी किंवा जन्मठेप ठोठावण्याचीही तरतूद आहे. घर, दुकान वा आस्थापना येथील दरवाजा तोडून, भिंत फोडून, छप्पर काढून अथवा भुयार खोदून करण्यात आलेली चोरी ही घरफोडी म्हणून मानली जाते आणि गुन्हेगारांवर ४९७, ३८० आणि ४५४ या कलमांनुसार कारवाई होते, असे सहाययक पोलीस आयुक्त किरण पाटील यांनी सांगितले.

 

First Published on November 15, 2017 2:01 am

Web Title: robbery in bank of baroda at navi mumbai part 2