दोघे गंभीर जखमी; यापूर्वी चार घटना

नवी मुंबई सीवूड सेक्टर ४८ मधील ‘शिवदर्शन’ सोसायटीतील एका घराच्या छताच्या प्लास्टरचा मोठा भाग सोमवारी मध्यरात्री कोसळला. यात झोपत असलेले नीलेश सुर्वे व त्यांची पत्नी विनिता सुर्वे या जखमी झाल्या. त्यांच्यावर सीवूडस येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पावसाळा सुरू झाला की नवी मुंबईतील अनेक सोसायटींमध्ये हे प्रकार होऊ लागले असल्याने सिडकोनिर्मित घरांच्या दर्जावर रहिवाशी प्रश्न उपस्थित करीत आहेत.

‘शिवदर्शन’ सोसायटीदेखील धोकादायक असल्याची माहिती सोसायटीतील पदाधिकाऱ्यांनी दिली. मध्यरात्री ही घटना झाली तेव्हा नीलेश सुर्वे यांचे आई-वडील व ७ वर्षांचा मुलगा बाहेर हॉलमध्ये झोपले होते. त्यामुळे सुदैवाने मोठी दुर्घटना टळली.

अवघे ४८ वय असलेल्या या नियोजित शहरात धोकादायक इमारतींच्या संख्या वाढत आहे. यावर्षी केलेल्या सर्वेक्षणात ४४३ इमारती धोकादायक म्हणून घोषित करण्यात आलेल्या आहेत. सिडकोच्या निकृष्ट कामामुळेच शहरातील सिडकोनिर्मित घरे ही अल्पावधीत धोकादायक होत असून त्यामुळेच अशा प्रकारे छताचा भाग कोसळून जखमी झालेल्यांची संख्या वाढली आहे.

भाजपचे माजी नगरसेवक भरत जाधव तसेच युवा पदाधिकारी दत्ता घंगाळे यांनी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांची भेट घेऊन विभागातील सर्व इमारतींची संरचना तपासणी करण्याची मागणी केली. तर राष्ट्रवादीचे नगरसेवक विशाल डोळस यांनी इमारतींची दुरुस्तीची मागणी करत मंगळवारपासून सिडको विरोधात ‘जेलभरो’ आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

शिवदर्शन सोसायटीमध्ये घरांच्या छताचे प्लास्टर कोसळण्याच्या यापूर्वीही ४ घटना घडल्या आहेत. त्यामुळे सोसायटी धोकादायक घोषित केली आहे. सिडकोने तात्काळ याबाबत निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. या धोकादायक इमारतीत रहिवाशी जीव मुठीत घेऊन राहात आहेत.

 -रवी माने, खजिनदार, शिवदर्शन सोसायटी.